संभाजीनगर: आझाद मैदानावरील पाच दिवसांच्या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता करत, अखेर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या समर्थकांसोबत मुंबई सोडली. मराठा आरक्षणासंबंधित राज्य सरकारकडून मागण्या मान्य करून घेत, जरांगे यांनी आपले उपोषण सोडले. त्यानंतर ते मुंबईहून थेट संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. पाच दिवसाच्या उपोषणामुळे जरांगेंची प्रकृती खालावली असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे असून, त्यांना दोन दिवस उपचार घेण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनाचा निर्धार करीत जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले होते. या आंदोलनामुळे मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्था आणि जनजीवन विस्कळीत झाले होते. ज्यामुळे जरांगेच्या आंदोलनाला प्रशासन तसेच न्यायालयाने तंबी देण्याचा देखील यादरम्यान प्रयत्न केला. मात्र, जरांगे आणि आंदोलकांचा निर्धार पाहता हे आंदोलन चिघण्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे, हे प्रकरण शांततेत हाताळण्यासाठी, अखेर मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यांच्याशी मराठा समाजाच्या मागण्यांवर चर्चा करून अंतिम तोडगा काढला. मंगळवारी राज्य सरकारने आठपैकी सहा मागण्या मान्य केल्या. उपसमितीने प्रस्तावित शासन निर्णयांचा मसुदाच सोबत ठेवला होता. त्यावर उपसमिती आणि जरांगे अशी दीर्घ जाहीर चर्चा झाली. जरांगे यांनी काही दुरूस्त्या सुचवल्या, त्या मान्य करत मंत्रिमंडळ उपसमितीने या आंदोलनाची कोंडी फोडली.
डॉक्टरांनी दिली प्रकृतीची माहिती
हैद्राबाद गॅझेटियरचा जीआर हाती घेत विखे पाटील यांच्या हातून लिंबुपाणी घेत जरांगे यांनी उपोषण सोडले. आंदोलनाची सांगता झाल्यानंतर जरांगे संभाजीनगरला रवाना झाले. तेथील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितलं की, "गेल्या सात दिवसांपासून जरांगेंचे उपोषण सुरू आहे. रूग्णालयात दाखल झाले तेव्हा त्यांना चक्कर येत होती. पोटामध्ये दुखत होतं. त्यांची तब्बेत नाजूक असून उपचार सुरू केले आहेत. बाकीच्या चाचण्या देखील सुरू आहेत."