मुंबई : यंदाचा ऑगस्ट महिना महाराष्ट्रासह देशासाठी पावसाळी ठरला आहे. मराठवाडा आणि विदर्भात तर हा पाऊस शेतकऱ्यांसाठी अक्षरशः बोनस ठरला आहे. लातूर, नांदेड, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, शेतीला मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांसोबतच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार तसेच सातारा जिल्ह्यातही अति मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मुंबईसह मध्य महाराष्ट्रालाही ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलाच झोडपून काढलं. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये तुफानी हजेरी लावल्यानंतर आता सप्टेंबर महिन्यातदेखील देशभरात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील सात दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
देशभरात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा!
भारतीय हवामान विभागाने आगामी दिवसांसाठी दिलेला अंदाज महत्वाचा ठरला आहे. सध्या समुद्राच्या तळाशी मान्सूनची द्रोणीय परिस्थिती सक्रिय असून, त्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. याचबरोबर राजस्थानच्या मध्यभागी चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, २ सप्टेंबरपासून बंगालच्या उपसागरावर नव्याने कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या प्रणालीमुळे देशाच्या विविध भागांत पुढील काही दिवसांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची हजेरी लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या या अंदाजामुळे पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला दिलासा मिळणार असून, नागरिकांना मात्र सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पंजाब : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात महापूर आला आहे. या पुरामुळे २० लाख नागरिक बेघर झाले आहेत. प्रशासन नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर ...
महाराष्ट्र-गुजरातसह कोकण, गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील सात दिवसांत गुजरात, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत तुफान पावसाची शक्यता आहे. विशेषतः २ आणि ३ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. तर ३, ४ आणि ५ सप्टेंबर रोजी कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्र या भागांत अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या अंदाजामुळे शेतीला पाण्याचा मुबलक पुरवठा होण्याची अपेक्षा असली तरी, नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
पुढील चार दिवसांचा पावसाचा कहर!
हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी महाराष्ट्रातील विविध भागांना अलर्ट जारी केला आहे. आजपासूनच तळ कोकणासह पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, मराठवाड्यातही पावसाची धमक कायम असून, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भही पावसापासून वंचित राहणार नाही. नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवसांत मुसळधार पावसाचा जोर राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार असला, तरी नद्यांच्या पातळीत वाढ, तसेच पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
०२ सप्टेंबर : उद्यापासून (२ सप्टेंबर) राज्यभरात पावसाची तीव्रता वाढणार असून, हवामान विभागाने विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर तळ कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पुणे घाटमाथ्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मराठवाड्यात लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांनाही पावसाचा फटका बसणार आहे.
०३ सप्टेंबर : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नगर, पुणे, बीड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर तसेच संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे पावसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांमध्येही ३ सप्टेंबर रोजी तुफानी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
०४ सप्टेंबर : रत्नागिरी, रायगड, पालघर तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी केला गेला आहे. या भागांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.