जम्मू-काश्मीर: जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. रामबनच्या राजगढ भागात झालेल्या या नैसर्गिक आपत्तीत तीन लोकांचा मृत्यू झाला असून, पाच जण बेपत्ता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे अनेक ठिकाणी ढगफुटी आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याचमुळे रामबन जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. या ढगफुटीमुळे अनेक घरांचेही मोठे नुकसान झाले असून, काही घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग (NH-44) देखील ठप्प झाला आहे, ज्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. प्रशासनाने लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. या भागातील शाळा आणि महाविद्यालये ३० ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, त्यामुळे प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.