मुंबई : मराठा समाजातील सर्वांना सरसकट कुणबी म्हणून आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे करत आहेत. तर मुंबई पोलिसांनी घातलेल्या अटीशर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी जरांगे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कारवाईची मागणी सदावर्ते यांनी केली आहे. सदावर्ते यांनी जरांगे यांच्याविरोदात ऑनलाईन पद्धतीने एक तक्रार दाखल केली आहे.
मुंबई पोलिसांनी जरांगेंना २९ ऑगस्ट रोजी फक्त संध्याकाळपर्यंत आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. ही मुदत संध्याकाळी सहा वाजता संपेल. यामुळे मुदत संपल्यानंतरही आंदोलन सुरू असल्यास जरांगे यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली आहे.
आझाद मैदानात पाच हजारांपेक्षा जास्त आंदोलकांची गर्दी झालेली आहे. अनेक रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि रास्ता रोको झालेले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत, असा आरोपही सदावर्ते यांनी केला. तसेच मनोज जरांगे यांच्यासह त्यांना पाठिंबा देणाऱ्या उद्धव ठाकरे, संजय जाधव , विजयसिंह पंडित, ओमराजे निंबाळकर, बजरंग सोनवणे यांच्यासह आंदोलनाला राजकीय समर्थन देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे. त्यामुळे आता नेमके काय होईल, याकडे अनेकांचे लक्ष आहे.