संगमनेर : संगमनेर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी ७.४० वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील मालपाणी लॉन्स येथे घडली. हल्लेखोर संगमनेर तालुक्यातील एका ग्रामीण भागातील आहे. यामुळे संगमनेर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. खताळ यांनी संयमाची भूमिका घेत कार्यकर्त्यांना संयम आणि शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे.
संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे गणेशोत्सवानिमित्त संगमनेर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. खताळ कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम पार पडल्यानांतर नागरिकांना भेटत त्यांच्या वाहनाकडे जात असताना ग्रामीण भागातील एका युवकाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्याला पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतले. ही बातमी वाऱ्यासारखी शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात पसरल्याने शेकडोंच्या संख्येने खताळ समर्थक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. खताळ यांनी जमलेल्या सर्वांनाच शांतता राखण्याचे आवाहन केले. घटनास्थळी पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला.
समर्थकांनी आणि नागरिकांनी शांत राहावे, खताळ यांचे आवाहन
सदर घटना ही विकृत बुध्दीच्या लोकांनी केली आहे. ज्याने हल्ला केला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करणार आहे. त्यामुळे आता कोणीही चुकीचे काम करायचे नाही. सर्वांनी संयम व शांततेची भूमिका पार पाडायची आहे. गणेश उत्सव असून आपल्याला हा सण आनंदाने साजरा करायचा आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आंदोलन करायचे नाही. सर्वांनी शांत राहावे, असे आवाहन खताळ यांनी समर्थकांना केले.