छत्रपती संभाजी नगर: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल समर्थकांनी एका युट्यूबरच्या तोंडाला काळ फासलं आहे, छत्रपती संभाजीनगरात ही घटना समोर आली आहे. तेथील एका युट्यूबरने मनोज जरांगे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने मनोज जरांगे यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले. समर्थकांनी अपशब्द वापरणाऱ्या त्या व्यक्तीचा शोध घेऊन, सर्वातआधी त्याचे कपडे फाडले, आणि त्यानंतर त्याच्या तोंडाला काळत फासलं आहे. ही घटना गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी पैठण येथील बस स्थानक चौक परिसरात घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जरांगे यांचा समर्थक प्रदीप ठोंबरे याने विदुर लगडे या युट्यूबरने जरांगे पाटील विरुद्ध आक्षेपार्ह विधान आणि पोस्ट केल्याबद्दल हे कृत्य केलं. सध्या या प्रकरणसंदर्भात पोलिस कारवाईला सुरुवात झाली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे आज (दि. २७ ऑगस्ट) मुंबईत धडकणार आहेत. तत्पूर्वी काही राजकीय व्यक्ति आणि सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर याच्या विरोधात असल्याचे दिसून येत आहे. हे सगळं सुरू असताना पैठण तालुक्यातील विदुर लगडे या युट्यूबरने मनोज जरांगे बद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. ती पोस्ट जरांगे समर्थकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल झाली. त्यामुळे मनोज जरांगे यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले होते.
पोस्ट एक वर्षांपूर्वीची
दरम्यान, या प्रकरणी पैठण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरांगेविरुद्ध केलेली ती आक्षेपार्ह पोस्ट एक वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे पैठण येथे जो प्रकार घडला तो आपसातील वादातून घडला असावा, असा अंदाज पोलिस करत आहे. त्यामुके या प्रकरणाचा तपास करत असल्याचे पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी सांगितले.