मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना मुंबईच्या दिशेने कूच करण्यासाठी आवाहन केले आहे. आता २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेरच आंदोलन करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांना धमकीवजा इशारा देताना त्यांच्या आईचा उल्लेख करत जरांगेंनी काही शब्दांचा वापर केला. जरांगेंच्या या वक्तव्यावरुन वादाला तोंड फुटले आहे.
आरक्षणासाठी कोणीही आंदोलन करू शकते. पण आंदोलनाच्या निमित्ताने कोणाच्याही मातेला उद्देशून अपशब्द वापरणे योग्य नाही; अशी प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली. मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड या सर्वांनीच जरांगेंच्या आक्षेपार्ह भाषेचा जाहीर निषेध केला. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शक्य तेवढ्या तरतुदी केल्या आहेत. तरीही वेगळ्या मागण्यांसाठी मराठा समाज जरांगेंच्या नेतृत्वात आंदोलन करणार असल्यास त्याला सरकारचा विरोध नाही. पण आंदोलनाच्या नावाखाली कोणाच्याही मातेला उद्देशून अपशब्द वापरणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांमध्ये २९ नव्या जातींचा समावेश केला आहे. पण मराठ्यांच्यावतीने केलेल्या मागण्या मान्य केलेल्या नाही, असा आरोप केला. आता मागण्या मान्य होत असतील तर मुंबईत येणार नाही. पण आरक्षण देत नसाल तर सरकार उलथवून टाकेन, अशी धमकी जरांगेंनी दिली.