छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित लोकसंख्येला शुद्ध व सातत्यपूर्ण पाणीपुरवठा देता येईल अशी योजना पूर्णत्वाकडे जात आहे. २६ द.ल.ली. हा या योजनेतील एक टप्पा आहे. उर्वरित कामेही वेळेत पूर्ण करून शहराला ३६५ दिवस २४X७ शाश्वत पाणीपुरवठा करता होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
फारोळा येथे २६ द.ल.ली. क्षमता असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे जलपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ.कल्याण काळे, खासदार डॉ.भागवत कराड, आमदार नारायण कुचे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार संजय केणेकर, आमदार सतीश चव्हाण, माजी महापौर नंदकुमार घोडेले, किशोर शितोळे, राजेंद्र जंजाळ, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, महानगर पालिका आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजीनगर शहरासाठी २०१९ मध्ये सुरू झालेल्या या पाणीपुरवठा योजनेला सुरूवातीला १८०० कोटींची मंजुरी मिळाली, महानगरपालिकेचा आर्थिक हिस्सा शासनाने उचलण्याचा निर्णय घेऊन या योजनेला गती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नव्याने सुरू केलेल्या अटल अमृत योजनेत या योजनेचा समावेश करण्यात आला. केंद्र शासनाच्या अटल अमृत योजनेतून हजारो कोटी रूपये महाराष्ट्राला दिले. ५६ एमएलडीच्या जुन्या योजनांचे पूर्नजीवन करण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरली. याच योजनेत छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेचा समावेश करण्यात आला असुन २७०० कोटी रूपये एकूण खर्च असलेली ही योजना जलदगतीने सुरू आहे. २०२३ मध्ये १८ टक्के वरुन २०२५ मध्ये या योजनेची प्रगती ८२ टक्क्यांपर्यत पोहोचली आहे. वॉर रूम प्रोजेक्टच्या माध्यमातून योजनेतील अडचणी दूर करून योजनेला गती देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
शहर पाणीपुरवठा योजनेतील अडथळे बाजूला करून योजना पूर्णत्वाकडे नेत असल्याचा उल्लेख करताना महानगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासह संबंधित यंत्रणांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री म्हणाले, वॉर रुममध्ये झालेल्या आढावा बैठकीत ही योजना जलदगतीने पुढे सरकत असल्याचे दिसून आले. सध्या केवळ काही किरकोळ कामे बाकी आहेत. ५६ ईएसआर तयार करण्याचे उद्दिष्ट असून त्यापैकी मोठा भाग पूर्ण झाला आहे. उर्वरित कामेही वेळेत पूर्ण करून पुढील २५-३० वर्षे शहराला ३६५ दिवस २४X७ शाश्वत पाणीपुरवठा देता येईल. महानगरपालिकेचा ८०० कोटी रूपयांचा हिस्सा शासनाने हुडकोमार्फत उपलब्ध करून दिला आहे. पुढील महिन्यात याबाबतची आवश्यक प्रक्रिया पूर्ण होऊन हा निधी मिळणार आहे. उर्वरित निधीचीही शासनाने तरतूद केली असून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. येत्या डिसेंबरपर्यंत योजना पूर्ण करा असे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
छत्रपती संभाजीनगर हे राज्यातील एक महत्वाचे शहर असून मॅन्युफॅक्चरिंग हब बनत असून औद्योगिक संधी वाढत आहेत. त्याला अनुरूप अशा पायाभूत सुविधा देणे गरजेचे आहे. याच उद्देशाने पाणी पुरवठा योजनेतील उर्वरित कामे जलद गतीने पूर्ण केली जातील. शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत प्रशासन व लोकप्रतिनिधींनी मिळून चांगले काम केले आहे. अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक निधी शासन उपलब्ध करून देईल. शहराच्या विकासासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन निर्णय घेतात ही बाब महत्वाची आहे. शहराच्या सर्वांगिण विकासासाठी निधीची कमतरता पडु देणार नाही, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी प्रास्ताविक केले. छत्रपती संभाजीनगर शहरास १०० द.ल.लि. आणि ५६ द.ल.लि. क्षमतेच्या दोन पाणी पुरवठा योजना सध्या कार्यान्वित आहेत. त्यातून १२०० मि.मी. लोखंडी, ७०० मी.मी. पाईपलाईन व्दारे १२० द.ल.ली व ९०० मि.मी. व्यासाच्या डीआय पाईप लाईन व्दारे २५ द.ल.ली असा एकुण १४५ द.ल.ली एवढा पाणी पुरवठा होत आहे. सद्यास्थितीत २६ द.ल.ली जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वीत करण्यात येत असल्यामुळे पाणी पुरवठ्यात २६ द.ल.ली एवढी वाढ होऊन एकुण १७१ द.ल.ली एवढा पाणीपुरवठा होणार असुन शहरातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
२६ द.ल.ली जलशुद्धीकरण केद्रांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बटण दाबुन उद्घाटन करण्यात आले, यावेळी जलपूजनही करण्यात आले.