मुंबई (प्रतिनिधी) : चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकला अपेक्षित प्रवासी संख्या अद्याप मिळालेली नाही. असे असले तरी मोनोरेल मार्गिकेवरून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पाच-दहा मिनिटांनी मोनोरेल गाडी सोडणे गरजेचे आहे. मात्र, मोनोरेलच्या ताफ्यात कमी गाड्या असून, दररोज या मार्गिकवरून अवघ्या पाच गाड्या धावतात. स्वदेशी बनावटीच्या १० नवीन मोनोरेल गाड्या सेवेत दाखल होणार आहेत, मात्र या दहा मोनो गाड्या सेवेत दाखल होण्यासाठी प्रवाशांना डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यामुळे नव्या मोनोसाठी प्रवाशांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मंगळवारच्या घटनेमुळे एका गाडीची मोठी हानी झाली असून ही गाडी सध्या दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्याने गुरुवारी चारच गाड्या धावत होत्या. त्यामुळे दोन गाड्यांमधील वारंवारीता वाढविण्यात आली होती. गाड्या कमी असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. नव्या १० गाड्या लवकरात लवकर सेवेत दाखल करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
गाड्यांची संख्या कमी असल्याने १५ ते ३० मिनिटांच्या कालावधीने गाडी सोडली जाते. त्यातच सध्या सेवेत दाखल असलेल्या गाड्या जुन्या आहेत. त्यामुळे एमएमआरडीएने स्वदेशी बनावटीच्या नवीन १० गाड्या खरेदी करून त्या सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १० मोनोरेल गाड्यांच्या बांधणीचे कंत्राट मेधा सर्वो ड्राईव्हज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. ५९० कोटी खर्च करून या १० गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. त्यानुसार सात नवीन गाड्या तयार होऊन मुंबईत दाखल झाल्या आहेत. या गाड्यांची चाचणी मागील काही दिवसांपासून सुरू आहे. या गाड्या सेवेत का दाखल केल्या जात नाहीत, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. उर्वरित तीन नवीन गाड्याही लवकरच मुंबईत येणार आहेत. पण या १० नवीन गाड्या सेवेत दाखल होण्यासाठी प्रवाशांना डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.