मुंबई : सध्या राज्यभरात काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग पाहायला मिळत आहे. दहा दिवसीय या उत्सवाची धूम आणि चकरमान्यांचा उत्साह लक्षात घेता, राज्य सरकारने राज्यातील शासकिय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी मोठी घोषणा केली आहे. खास गणेशोत्सवानिमित्त ऑगस्ट महिन्याचा पगार ५ दिवस आधीच बँक खात्यात जमा केला जाणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन २६ ऑगस्ट रोजीच देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
महाराष्ट्रभर गणेशोत्सव खूप थाटामाटात साजरा केला जातो. या उत्सवाची धामधूम मोठी असल्याकारणांमुळे, खास या सणासाठी नोकरदार वर्गीय वर्षभर आर्थिक नियोजन करत असतात. त्यामुळे खास या सणासाठी, सरकारकडून शासन निर्णय काढून १ सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन २६ ऑगस्ट रोजी देण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. जेणेकरून गणेशोत्सव काळातील खर्चासाठी खिसा गरम आणि हात ढिला होणार नाही.
जिल्हा परिषद, मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषि विद्यापीठे/ कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत वेतनधारक / कुटुंब निवृत वेतनधारक यांनाही हा निर्णय लागू राहणार आहे. त्यामुळे, या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाला तब्बल ५ दिवस आधीच आपला पगार मिळणार आहे.