नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला. ही घटना आज म्हणजेच बुधवारी सकाळी जनसुनावणी दरम्यान घडली. एका ३५ वर्षांच्या व्यक्तीने मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण मुख्यमंत्र्यांच्या अंगरक्षकांनी संबंधित व्यक्तीला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस पकडलेल्या व्यक्तीची कसून चौकशी करत आहे.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी झाला. आरोपी काही कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्र्यांच्या घरी जनसुनावणीत पोहोचला होता. त्याने अचानक मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हाती आलेल्या वृत्तानुसार, आरोपीने मुख्यमंत्र्यांना थप्पड मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला पकडले आहे.
आरोपीने मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याचे कारण अद्याप समजलेले नाही. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांचे संरक्षण आणखी मजबूत करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सुरक्षित असून त्यांची दैनंदिन कामं नियोजनानुसार सुरळीत सुरू आहेत.