मुंबई: राज्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस चांगलाच कोसळत आहे. हवामान विभागाने २० ऑगस्टलाही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे ठाणे, पालघर, नवी मुंबई, रत्नागिरी आणि सातारा या ५ जिल्ह्यातील शाळांना बुधवारी २० ऑगस्टला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
अतिवृष्टीची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या राज्यांमधील सर्व शाळा बुधवारी बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्यात आज पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. नेहमी चालत राहणाऱ्या मुंबईचा वेग या पावसामुळे मंदावला. मुंबईतील वाहतुकीचे तर तीन तेरा वाजले होते.
ठाणे जिल्ह्यासह रत्नागिरी तसेच पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच कोकण भागातही पावसाची दमदार हजेरी आहे. खेडमध्ये जगबुडी नदीने पाण्याची पातळी ओलांडली आहे. कोकणातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
रत्नागिरीतील सर्व शैक्षणिक संस्थांना अतिवृष्टीमुळे २० ऑगस्टलाही सुटी
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना अतिवृष्टीमुळे बुधवारी २० ऑगस्टलाही सुटी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्ह्यात तीन दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस सुरू असून, १७-१८ ऑगस्टला हवामान विभागाने जिल्ह्याला रेड अॅलर्ट दिला होता. आज, १९ ऑगस्टलाही दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. खेड, राजापूर, चिपळूणसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाड्यांपासून महाविद्यालयांपर्यंतच्या सर्व शैक्षणिक संस्थांना उद्याही (दि. २० ऑगस्ट) सुटी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या मान्यतेने निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी हा निर्णय घेतला आहे. त्याबद्दलचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे आजही (१९ ऑगस्ट) शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती.