Ajit Pawar on Mumbai Rain : मुंबई हायअलर्टवर, “बैठक होणारच, रद्द नाही”; अजित पवार म्हणाले, कर्मचारी फक्त आंघोळीला...

  26

मुंबई : सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबईवर पावसाने धुमाकूळ घातला आहे. सलग दोन दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा जोर कायम असून त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर पाणी साचले असून, वाहतूक कोंडी, रेल्वे वाहतुकीतील उशीर यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, मुंबईतील मिठी नदीची पातळी सतत वाढत आहे आणि नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली असून सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, उपनगरे, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत नागरिकांनी खबरदारी घ्यावी, सुरक्षित स्थळीच राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.



१० लाख एकर क्षेत्र पाण्याखाली; अजित पवारांचा राज्यभर आढावा


राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज याबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दुपारी १२ वाजता नव्या अहवालानुसार परिस्थितीचे अद्ययावत मूल्यमापन होणार आहे. सध्या राज्यभर मुसळधार पाऊस सुरू असून तब्बल १० लाख एकर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात परिस्थिती हाताळण्यासाठी सैन्यदलाची मदत घेण्यात आली आहे. काही गावं पाण्याच्या घेरावात सापडली असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अजित पवारांनी नागरिकांना आवाहन केलं की, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं; अन्यथा सुरक्षिततेच्या दृष्टीने घरीच थांबणं योग्य ठरेल. सातारा, कोल्हापूर आणि पुणे घाटमाथा भागात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, पोलिस प्रशासन पूर्णपणे सतर्क मोडवर असून संपूर्ण यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहे. अजित पवार म्हणाले, “२४ तासांपासून अधिकारी, कर्मचारी पावसावर लक्ष ठेवून आहेत. लोकं घरी जाऊन आंघोळ करत आहेत, नाहीतर सगळी यंत्रणा इथेच तैनात आहे.”



कॅबिनेट होणार आहे, रद्द होणार नाही


राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आजची कॅबिनेट बैठक होणार असून, ती रद्द करण्यात आलेली नाही. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्य सरकारकडून सध्या सर्व ३६ जिल्ह्यांतील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेने शासकीय व खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे, मात्र मंत्रालयात काही कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित आहेत. अजित पवार म्हणाले की, “१२ वाजता होणाऱ्या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल. मुंबईत सुट्टी जाहीर केली की ती मंत्रालयालाही लागू होते, पण अद्याप तसा निर्णय झालेला नाही.” आजची कॅबिनेट बैठक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्री मंडळातील सदस्य परिस्थितीनुसार उपस्थित राहतील. अनेक अधिकारी मंत्रालयातच थांबले आहेत, त्यामुळे पुढील धोरण आणि निर्णय याच बैठकीत निश्चित होणार आहेत.





पुढील २४ तास पावसाचा जोर कायम-हवामान विभागाचा इशारा


मुंबई उपनगरात मागील २४ तासांत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. विक्रोळी परिसरात तब्बल २५५.५ मिमी पावसाची नोंद झाली असून, हा सर्वाधिक पाऊस असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. त्यासोबतच भायखळा, सांताक्रुज, जुहू आणि वांद्रे परिसरातही अतिवृष्टी झाली आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठीही पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा दिला आहे. सतत दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली असून, वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ठाणे परिसरालाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे. ठाणे–कळवा–मुंब्रा खाडी परिसरात भरतीला सुरुवात झाली आहे. खाडीकिनाऱ्यालगत असणाऱ्या बोटींचे मोठे नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाने मच्छीमारांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Comments
Add Comment

राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय: आरोग्य आणि भूमी वापरासंदर्भात घोषणा

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक

गोरेगाव ओबेरॉय मॉल परिसरात साचले पाणी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

गोरेगाव येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली मुंबई: सलग दोन दिवस पडत असलेल्या

Devendra Fadanvis : मुंबईत भरतीच्या वेळी पाऊस पडला तर, धोका वाढेल...मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : नांदेड जिल्ह्यात मंगळवारी ढगफुटीसदृश पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची

महाराष्ट्रात ४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २८ हजारांहून अधिक रोजगार निर्मिती

मुंबई : महाराष्ट्र आता ‘डेटा सेंटर कॅपिटल’ आणि ‘सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल’ म्हणून पुढे येत आहे. अनेक कंपन्या या

Mumbai Filterpada Powai : पाय घसरला आणि थेट नाल्याच्या प्रवाहात; फिल्टरपाड्यातील युवकाचा जीवघेणा प्रसंग

मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण केली आहे. अशातच पवईतील फिल्टर पाडा

पुढील ३ तास धोक्याचे! मुंबईकरांना सतर्क राहण्याचे थेट मंत्रालयातून आदेश

मुंबई: पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड तसेच पुणे घाट या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा