शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची आज सोमवारी सकाळपर्यंत संततधार सुरु आहे. तसंच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामन खात्याने वर्तवली आहे. मुसळधार पावसामुळे नाले तुडुंब भरून वाहण्याची, रस्ते वसाहती जलमय होण्याची, वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता असून नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने, तर हार्बर रेल्वे 5 मिनिटं उशिरा धावत आहे. आठवड्याचा पहिला दिवस आणि आजही मुंबईत जोरदार पाऊस पडतोय.
यामुळे सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्याना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्याचा दावा केला असला तरी अचानक मुसळधार पावसाचा फटका बसल्यास जनजीवन विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, किनाऱ्यावर व नदीनाल्यांच्या काठावर जाणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
पुढील ४ ते ५ दिवसांत महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. १८ ऑगस्ट रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, घाट परिसर, मराठवाडा, विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पावसाचा जोर वाढल्यास काही भागांत तालुक्यातील नद्यांमध्ये पुरसदृश स्थिती निर्माण होऊ शकते.
मुंबईत कुठे किती पाऊस? (पहाटे५.३० पर्यंतच्या २४ तासांत)
- टाटा पॉवर चेंबूर ८१.५ मिमी
- सांताक्रूझ ७० मिमी
- विक्रोळी ६९ मिमी
- सायन ६७ मिमी
- जुहू ५८ मिमी
- भायखळा ५८ मिमी
- बांद्रा ५४ मिमी
- कुलाबा २२ मिमी
मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट, तर पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील घाट परिसराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणामध्ये मुसळधार याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार कोकणातल्या बहुतांश भागात मध्यरात्रीपासून पाऊस आहे. किनारी भागांमध्ये देखील वाऱ्याचा वेग असून पाऊस जोराचा आहे.