हवामान विभागाने कोकणात आणि मध्यम महाराष्ट्रात 18 ऑगस्ट 2025 पर्यंत अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे.
चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून चिपळूण शहर व परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नागरिकांमध्ये काही प्रमाणात चिंता निर्माण झाली होती. मात्र, सध्या पाणीपातळी नियंत्रणात असून प्रशासनाने नागरिकांना काळजी न करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान शहरातील काही ठिकाणी पावसाचं पाणी रस्त्यावर साचलं आहे. सध्या वशिष्ठी नदीची पाणी पातळी ४.५२ मी आहे. पाणी पातळी कमी होत आहे. इशारा पातळी ५ मी आहे. कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी १३३.८५ मी असून एक मशिन भरती संपल्यानंतर सकाळी ७.४५ वा सुरू केलेली आहे.
सध्या ओहोटी सुरु आहे. कोळकेवाडी धरणातील पाणी कमी करणे आवश्यक असल्याने एक मशिन सुरू आहे.दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावं असं आवाहन प्रशासनाने केलं आ. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ८३.३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये खेड तालुक्यात सर्वाधिक १७८.७१ मिमी पावसाची नोंद झाली, तर चिपळूण आणि दापोलीमध्ये १२५ मिमी, तर मंडणगडमध्ये ११६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. उत्तर रत्नागिरीत पावसाचा जोर कायम आहे.
खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी (७ मीटर) ओलांडली असून, सध्या तिची पाणी पातळी ७.२० मीटरवर पोहोचली आहे. त्यामुळे खेड शहरातील मच्छी मार्केट परिसरात पाणी शिरलं आहे. जगबुडी नदीकाठच्या रहिवाशांना आणि बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुसळधार पावसाचा फटका वाहतुकीलाही बसला आहे. नारिंगी नदीला आलेल्या पुरामुळे खेड-दापोली रस्त्यावर पाणी साचलं असून, या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजारपेठेत गडनदीच्या पुराचं पाणी दुसऱ्यांदा शिरलं आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. दरवर्षी अशा परिस्थितीचा सामना करावा लागत असल्यामुळे प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी केली आहे.
दापोलीत मुसळधार पाऊस सुरु असून कादिवली मधील दादर पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. दापोली तालुक्यातील असोंड गावातील अंतर्गत रस्ता पाण्यामुळे वाहून गेला आहे. मुसळधार पावसाचा फटका सध्या खेड दापोली आणि चिपळूणला बसला आहे.