मुंबई : मुंबईत आज सर्वत्र दहीहंडीचा सण उत्सवात आणि जल्लोषात साजरा केला जाणार आहे. त्यानुसार ठिकठिकाणी दहीहंडी आणि विशेष सभा मंडप बांधण्यात येत आहेत. ज्यामधील अनेक दहीहंडी विविध राजकीय नेत्यांची तसेच पक्षांची असल्याकारणामुळे, येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीच्या उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचा राडा होणार नाही, यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. दरवर्षी विविध राजकीय पक्षाच्या वतीने मुंबई तसेच ठाणे परिसरात दहीहंडीचे आयोजन करून मोठी बक्षिसे ठेवण्यात येतात. मात्र यावर्षी याचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता असल्यामु, कोणत्याही प्रकारचा अपघात किंवा अनुचित घटना घडू नयेयासाठी मुंबई पोलिसांनी आयोजनाच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे. खास करून, गर्दीमध्ये महिला सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार असून नियम मोडणारी मंडळे, आयोजकांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी किंवा प्रतिमेला मज्जाव करण्यात आला आहे.
जखमी गोविंदांसाठी रुग्णालये सज्ज
यंदा जखमी गोविंदांच्या उपचारासाठी जेजे रुग्णालयामध्ये ३० खाटा राखीव असलेला स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर अस्थिव्यंग विभागामध्येही काही खाटा राखीव ठेवण्यता आल्या आहेत. तसेच अपघात विभागामध्येही सर्व वैद्यकीय सुविधा आणि औषधांची उपलब्धता ठेवण्यात आल्याची माहिती जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी दिली. त्याचप्रमाणे केईएम रुग्णालयामध्येही १५ खाटा जखमी गोविंदांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.