मे महिन्याच्या अखेरीपर्यंत मुसळधार कोसळल्यानंतर जून महिन्यात पावसाची बऱ्यापैकी हजेरी होती. जुलै महिन्यात मात्र पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र होते. मात्र मागील दोन दिवसांपासून पावसाने जिल्ह्याला अक्षरश झोडपून काढले आहे. विना उसंत कोसळणाऱ्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान देखील केले आहे. पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली आहे. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर मासेमारीसाठी गेलेल्या नौका किनार्यावर आश्रयाला आल्या आहे.
खोल समुद्रात उंच लाट उसळत असल्यामुळे मच्छिमारांना मासेमारी करणे अवघड झाले आहे. त्यामुळे मच्छिमारांनी नौकांसह किनार्यावर आश्रय घेतला आहे. त्यामुळे मासेमारी पु्र्णत: ठप्प झाली आहे. जाकिमिऱ्या, पंधरामाड समुद्र किनारीही लाटांचे तांडव पहायला मिळत आहे. लाटा जोरदारपणे किनार्यावर आदळत आहेत.
मासेमारी पुर्णत: ठप्प झाल्यामुळे मिरकरवाडा बंदरातील मत्स्य विक्रिवर परिणाम झाली आहे.श्रावण महिना सुरु झाल्याने मस्त्य खवय्यांची संख्या कमी आहे. मात्र तरीही अनेक मत्स्यप्रेमी मच्छि खरेदीसाठी मिरकरवाडा बंदरात दाखल होत आहेत. अनेकांना रिकामी हाती परत जावे लागत आहे. तर किनार्या लगत मासेमारी करणार्या नौकांमुळे उपलब्ध होणाऱ्या मच्छिला सोन्याचा दर आला आहे. पापलेट सहाशे रु.किलोने, तर बोंबील २०० रु. किलोने विक्रिला जात आहे.