नवी दिल्ली: पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक व निर्णायक कारवाई करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या ३६ जवानांना केंद्र सरकारने शौर्य पुरस्कारांनी गौरवले आहे. यामध्ये ९ जणांना वीर चक्र, एकाला शौर्य चक्र व २६ जणांना वायुसेना पदक प्रदान करण्यात आले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून लष्करी कारवाईचा निर्णय घेतला.
वीर चक्र कोणाला मिळाले?
ग्रुप कॅप्टन आर. एस. सिद्धू, ग्रुप कॅप्टन मनीष अरोरा, ग्रुप कॅप्टन अनिमेष पाटणी, ग्रुप कॅप्टन कुणाल कालरा, विंग कमांडर जॉय चंद्रा, स्क्वाड्रन लीडर सार्थक कुमार, स्क्वाड्रन लीडर सिद्धांत सिंग, स्क्वाड्रन लीडर रिजवान मलिक, फ्लाईट लेफ्टनंट ए. एस. ठाकूर या अधिकाऱ्यांनी आपल्या टीमसह पाकिस्तानातील कठोर संरक्षित भागांमध्ये अचूक बॉम्बहल्ले करून दहशतवादी नेटवर्कला धक्का दिला. एका जवानाला ‘शौर्य चक्र’ प्रदान करण्यात आले आहे.
२६ वायुदल अधिकाऱ्यांना ‘वायुसेना पदक’ देण्यात आले आहे. हे पदक शांततेच्या काळात उत्कृष्ट कामगिरीसाठी दिले जाते. भारत सरकारने पहिल्यांदाच वायुदलाच्या अधिकाऱ्याला ‘सर्वोत्तम युद्ध सेवा पदक’ जाहीर केले आहे. हे पदक युद्ध परिस्थितीत दिलेल्या सर्वोत्कृष्ट सेवेबाबत दिले जाते.