वसई : "भाषा नंतर मरते, पण लिपी आधी मरते. तिच्या नियमित वापराची आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. माणसं, झाडं आणि भाषा तिघांनीही एकत्र जगल पाहिजे, तेव्हाच संस्कृती जिवंत राहते" असा संदेश सुप्रसिद्ध राजकीय विश्लेषक आणि मराठी भाषा संवर्धन कार्यकर्ते डॉ. दीपक पवार
यांनी दिला.
अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळ उद्घाटनप्रसंगी ‘अभिजात मराठी भाषा आणि समकालीन संदर्भ’ या विषयावर बोलताना त्यांनी वाङ्मय मंडळांची घसरती स्थिती, वाचनसंस्कृतीचा ऱ्हास, रोमन लिपीचा वाढता वापर आणि लिपीच्या प्रमाणीकरणाची गरज यावर भर दिला. "आपल्या संगणक व मोबाईलच्या वापरात मराठी लिपीला प्राधान्य द्या" असे त्यांनी आवाहन केले.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरही निधीअभावी विकासाची गती मंदावल्याचे त्यांनी सांगितले. "गेल्या काही वर्षांत अनेक मंडळं निष्क्रिय झाली असली तरी, ५०हून अधिक सर्जनशील उपक्रम राबवून आपण मराठीचा वारसा नव्या पिढीकडे पोहोचवू शकतो" असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात वाङ्मयमंडळ विद्यार्थी अध्यक्ष महेश जयसवाल आणि उपाध्यक्ष नेहा साबळे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सखाराम डाखोरे यांनी केले. विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे खजिनदार हसमुख भाई शहा आणि संस्थेच्या सदस्य व सुप्रसिद्ध चरित्र लेखिका वीणा गवाणकर, सुप्रसिद्ध कवी सायमन मार्टिन यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.