मुंबई: मुंबईसह उपनगरात मध्यरात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. तसेच पुढील तीन ते चार तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे.
पावसामुळे मुंबईच्या पश्चिम आणि मध्य रेल्वे सेवांवरही परिणाम झाला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल काही मिनिटे उशिराने सुरू आहेत. दरम्यान, या पावसाचा रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला नाही.
पश्चिमेतील जोगेश्वरी, अंधेरी, बोरिवली, मालाड, दहिसर, सांताक्रुझ, वांद्रे, कांदिवली या ठिकाणी पहाटेपासूनच पावसाने जोर धरला आहे. दरम्यान, अद्याप कुठेही पाणी भरल्याचे वृत्त नाही.
काय आहे हवामान खात्याचा इशारा?
१३ ते १५ ऑगस्टदरम्यान, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर मराठवाड्यात १४ आणि १५ ऑगस्टला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.