मुंबई : मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्यावतीने दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवाजीपार्क परिसरात स्टीलच्या लटकत्या कचरा पेट्या बसवण्यात आल्या आहेत; परंतु, या कचरा पेट्याच आता चोरीला जाऊ लागल्या आहेत. या नवीन पेट्यांमध्ये लोकांना कचरा टाकण्यास सवय लागण्यापूर्वीच यांची चोरी झाल्यामुळे नक्की या परिसरातील लोकांनी कचरा टाकायचा कुठे असा सवाल उपस्थित केला जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग परिसरात यापूर्वी हेरिटेज दर्जाच्या कचरा पेट्या दोन वर्षांपूर्वीच बसवण्यात आल्या होत्या, त्यानंतर या कचरा पेट्याही तुटल्यामुळे त्यांची चोरी होऊन अगदी त्या जागी त्यांचे सांगाडे उभे राहिले आहे.
त्यानंतर मागील महिन्यांत याच परिसरात स्टीलच्या लटकत्या मोठ्या आकाराच्या ओल्या व सुक्या कचऱ्याच्या पेट्या लावण्यात आल्या होत्या. पण या ओल्या आणि सुक्या कचऱ्याच्या पेट्यांमधील जोडीतील जवळपास अनेक ठिकाणी एकेक पेटी चोरीला गेली आहे. काही ठिकाणी सुक्या कचऱ्याची आणि काही ठिकाणी ओल्या कचऱ्याची पेटी चोरीला गेली आहे.
महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शिवाजीपार्क परिसराच्या सुशोभीकरणाच्या आणि याठिकाणी फिरण्यास येणाऱ्या नागरिकांना कचरा टाकता यावा याकरता काही दिवसांपूर्वीच या कचरा पेट्या बसवण्यात आल्या होत्या. परिसरात या सर्व बाजूंनी कचरा पेट्या बसवण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. याबाबत महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त विनायक विसपुते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत अजून तक्रार आलेली नाही, तरीही याची माहिती घेण्यात येईल,असे सांगितले.