तुळजापूर: तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामावरून सुरू असलेल्या वादामुळे तुळजापूरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंदिरात भेट दिल्यानंतर येथे मोठा तणाव निर्माण झाला. मंदिराच्या आवारात सुरक्षा रक्षक आणि आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे.
मंदिराचा जीर्णोद्धार करताना मंदिराचे शिखर उतरवण्यास आमदार आव्हाड यांनी विरोध दर्शवला आहे. या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी ते थेट तुळजापूर येथे दाखल झाले. त्यांनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर जीर्णोद्धार कामाची पाहणी केली. त्याचवेळी, मंदिराबाहेर भाजपचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले. 'मुंब्राच्या आमदाराने येथे येण्याचे काय कारण?' असा सवाल करत त्यांनी आव्हाड यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. भाजप कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून आव्हाड यांची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
याचवेळी, आव्हाड यांना मंदिरात सोडल्यानंतर त्यांच्या समर्थकांनीही मंदिरात प्रवेश करण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाले आणि नंतर धक्काबुक्कीही झाली. या गोंधळामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यांना बराच वेळ दर्शनाच्या रांगेत थांबावे लागले.
यादरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या गाडीसमोर ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली. 'आव्हाड यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या असून, त्यांनी माफी मागावी,' अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. तुळजाभवानी मंदिराचा कळस काढण्यावरून आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या सर्व प्रकारामुळे मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, ज्यामुळे तणावाचे वातावरण होते.