निंबवली मार्गावरील नागरिकांनी मानले आभार
अनंता दुबेले
कुडूस : वाडा तालुक्यातील निंबवली - पालसई हा रस्ता अत्यंत खराब झाला असून जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडले होते. या रस्त्यावर प्रवास करणारे स्थानिक नागरिक व वाहन चालक हैराण झाले होते. या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी भाजपचे पालघर उपजिल्हाध्यक्ष कृष्णा भोईर व माझी सभापती अरुण गौंड यांनी सोमवार (दि.११) रोजी पुढाकार घेऊन स्थानिक खदान मालकांच्या सहकार्याने ८ कि.मी. रस्त्याची खड्डे भरून दुरुस्ती केली आहे.
तालुक्यातील निंबवली- पालसई हा रस्ता मोठ्या रहदारीचा असून अनेक गावांना व बाजारपेठेस जोडणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर प्रवास करतांना वाहन चालकांसह नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.तसेच आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. हीच बाब लक्षात घेऊन येथील स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन हा रस्ता खड्डे भरून सुस्थितीत केल्याने वाहन चालकांसह नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
निंबवली-पालसई रस्ता वरून अहमदाबाद हायवे व भिवंडी-वाडा महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यास बहुतांशी गुजरात कडे किंवा मुंबई कडे जानारी वाहाने याच मार्गावरून जातात यामुळे हा रस्ता फारच खराब व खड्डेमय झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार लेखी दुरुस्तीची मागणी करूनसुद्धा दुरुस्ती करण्यात आली नाही.
त्यामुळे येथील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. मुंबई बडोदा हायवेचे काम करणारी ऍपको कंपनी कडून ग्रेडर, रोलर व जे के स्टोन कंपनी कडून जीएसबी खडी, जेसीबी आदींची मदत पुरवून ८की.मी. रस्त्यावरील खड्डे भरून रस्ता सुस्थितीत करण्यात आला आहे.या रस्ता दुरुस्तीसाठी भाजपा उपजिल्हाध्यक्ष कृष्णा भोईर, माजी पं. स. वाडा सभापती अरुण गौंड, भाजप कार्यकर्ते विठ्ठल हिरवे,आकाश गुप्ता, प्रकाश गरेल, संजय गरेल, सुनील फराड व इतर कार्यकर्त्यांनी रस्ता दुरुस्तीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.