शहरातील ४ हजार ८०० पैकी तब्बल तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बंद
पिंपरी : शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे रोखणे आणि तपासात ठोस पुरावे मिळविणे, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे हा महत्त्वाचा ‘तिसरा डोळा’ मानला जातो; मात्र पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च करून बसविण्यात आलेले बहुतांश सीसीटीव्ही बंद असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
पोलिसांना गुन्ह्यांचा मागोवा घेणे, वाहन क्रमांक ओळखणे व घटनास्थळावरील हालचाली टिपणे या तपास प्रक्रियांमध्ये अडथळे येत आहेत. शहरात दोन प्रमुख यंत्रणांतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पालिकेच्या वतीने ‘मॅट्रिक्स’ कंपनीकडून उभारण्यात आलेल्या १ हजार ८०० कॅमेऱ्यांपैकी फक्त एक हजार कॅमेरे कार्यरत आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बसविण्यात आलेल्या तीन हजार कॅमेऱ्यांपैकी ८०० कॅमेरे सुरू आहेत. उर्वरित कॅमेरे तांत्रिक बिघाड, वीजजोडणीतील अडथळे, पावसामुळे नुकसान, बॅटरी व केबल चोरी तसेच देखभालअभावी बंद पडले आहेत. त्यामुळे शहरातील कॅमेऱ्यांची कार्यक्षमता ३३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
शहरातील व्यापारी संकुले, सोसायट्या, उद्योग, हॉटेल यांना सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक असून, काही महिन्यांचे फुटेज साठवणेही नियम आहे; मात्र खर्च टाळण्यासाठी अनेकांनी हा नियम मोडला आहे. काही सोसायट्यांनी फक्त नावापुरते कॅमेरे लावले असून प्रत्यक्षात ते बंद असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. केवळ सरकारी कॅमेऱ्यांवर अवलंबून राहणे पुरेसे नाही, असा सल्ला पोलिसांकडून दिला जात आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे हे तपासातील डोळस साक्षीदार आहेत; मात्र सध्या सुस्थितीत असलेल्या कॅमेऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे अनेक प्रकरणांत पुरावे मिळविण्यात अडचणी येत आहे. चोरी, अपघात, मारामारीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये परिसरातील कॅमेरे कार्यरत असल्यास आरोपींची ओळख पटवणे आणि जलद कारवाई करणे शक्य होते. महापालिका प्रशासनाने सर्व कॅमेरे तातडीने कार्यान्वित करावेत.
- वरिष्ठ पोलीस अधिकारी, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड