मुंबई : मेट्रो मार्ग क्रमांक ४ मध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे घाटकोपर पूर्व भागातील पंतनगर-घाटकोपर बस स्थानकावर स्टील स्पॅन यशस्वीरीत्या बसविण्यात आला.
फक्त २ रात्रीत हे काम पूर्ण करण्यात आले. या वर्दळीच्या रस्त्यावर ५८ मीटर लांबीचा स्टील स्पॅन उचलून त्याच्या निर्धारित जागेवर बसविण्यात आला. हे काम करत असताना मुसळधार पाऊस, अंधेरी घाटकोपर लिंक रस्त्यावर असणारी प्रचंड वाहतूक आणि जवळच्या सोमय्या नाल्यामुळे मर्यादित जागा अशा कठीण परिस्थितीत हे काम अतिरिक्त संसाधनांचा वापर करून सुरळीत पार पाडण्यात आले.
लांबी : ५८ मीटर, उंची : ३.१ मीटर, वजन : ४५० टन,एकूण ५ स्टील गर्डर असा स्टील स्पॅनचा तपशील आहे. मेट्रो लाईन ४ (वडाळा ते कासारवडवली) आता ८४.५ टक्के पूर्ण झाले आहे. या विशेष स्पॅनच्या पूर्णतेमुळे मुंबई महानगर प्रदेश जलद आणि सुरळीत प्रवासाच्या दिशेने एक पाऊल पुढे जात आहे. एमएमआरडीएच्या या आव्हानात्मक आणि गुंतागुंतीच्या कामाच्या यशस्वी आणि सुरक्षित पूर्णतेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या, आपले अमुल्य योगदान देणाऱ्या सर्व सरकारी अधिकाऱ्यांचे आणि संबंधित बाकी एजन्सींचे एमएमआरडीएने आभार मानले.