मुंबई : नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील महत्वाचे सरदार रघुजी भोसले प्रथम यांची ऐतिहासिक तलवार अखेर महाराष्ट्राच्या ताब्यात आली आहे. लंडनमध्ये झालेल्या लिलावात महाराष्ट्र सरकारने ही तलवार विकत घेतली असून, आज सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी लंडन येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून तिचा ताबा घेतला. राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे परदेशात गेलेली ही अमूल्य ऐतिहासिक वस्तू आता मायभूमीत परत येत आहे. सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ही तलवार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होणार असून, त्यानंतर विशेष मिरवणुकीतून ती दादर येथील पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे नेण्यात येईल. महाराष्ट्राच्या इतिहासातील हा एक अभिमानास्पद क्षण ठरणार आहे.
इतिहासातील अनमोल ठेवा असलेली रघुजी भोसले यांची तलवार लिलावात निघाल्याची माहिती २८ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्रात आली आणि राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला. ही बातमी कळताच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. तलवार परत मिळवण्यासाठी तात्काळ नियोजन करण्यात आले. त्या रात्रीच उशिरापर्यंत मुख्यमंत्री आणि मंत्री शेलार यांनी परस्पर संपर्क ठेवून पुढील कार्ययोजना आखली. संबंधित देशातील भारतीय दूतावासाशी संवाद साधण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, मंत्री शेलार यांनी मध्यस्थाची नेमणूक करून महाराष्ट्र सरकारचा लिलावात सहभाग निश्चित केला. कठोर पाठपुराव्यानंतर आणि स्पर्धात्मक बोली लावून अखेर महाराष्ट्राने हा लिलाव जिंकला व तलवार परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला.
'हा केवळ माझा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा ऐतिहासिक विजय'
महाराष्ट्र शासनातर्फे लिलावात यशस्वी बोली लावणाऱ्या मध्यस्थाला लंडनमध्ये प्रत्यक्ष भेटून, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार औपचारिकरित्या ताब्यात घेतली. परदेशात गेलेली आणि लिलावातून परत मिळवलेली ही पहिलीच ऐतिहासिक वस्तू ठरली आहे. तलवार ताब्यात घेतल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना ॲड. शेलार म्हणाले, “अनेक पराक्रमांची साक्ष देणारी ही तलवार आपल्या ताब्यात घेण्याचे भाग्य मला लाभले. हा केवळ माझा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा ऐतिहासिक विजय आहे.” या सोहळ्याला लंडनमधील मराठी समाज मोठ्या संख्येने हजर होता. उपस्थितांनी घोषणाबाजी करत आणि जल्लोष साजरा करून या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत केले. महाराष्ट्राचा इतिहास परत मिळवण्याच्या या यशस्वी मोहिमेमुळे मराठी बांधवांमध्ये अभिमानाची लाट उसळली आहे.
रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार सोमवारी महाराष्ट्रात
सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार येत्या सोमवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होणार आहे. तलवारीचे स्वागत करण्यासाठी स्वतः सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार उपस्थित राहणार असून, विमानतळावरून भव्य बाइक रॅलीच्या माध्यमातून ही तलवार वाजतगाजत दादर येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीपर्यंत नेली जाणार आहे. यानंतर १८ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘गड गर्जना’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये या ऐतिहासिक विजयाचा उत्सव साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारला मिळालेल्या या यशाबद्दल ॲड. शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वामुळे हा क्षण शक्य झाल्याचे सांगत, “सरकारच्या नावाने नोंद होईल असा हा ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
लातूर : “मुंडेसाहेबांनी त्यांच्या जिवंतपणीच मला वारस घोषित केलं. त्यामुळे त्या वारशासोबत संघर्ष आणि कारस्थानही माझ्या वाट्याला आलं,” असा थेट आणि ...
मराठा साम्राज्याचे सेनासाहिबसुभा
नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक पराक्रमी सेनानी म्हणून रघुजी भोसले प्रथम (१६९५ – १४ फेब्रुवारी १७५५) यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. त्यांच्या अपार शौर्य आणि अप्रतिम युद्धनीतीमुळे छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही मानाची पदवी बहाल केली होती. रघुजी भोसले प्रथम यांनी १७४५ आणि १७५५ मध्ये बंगालच्या नवाबाविरुद्ध दोन मोठ्या युद्धमोहिमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याचा विस्तार बंगाल आणि ओडिशापर्यंत झाला. इतकेच नव्हे, तर त्यांच्या कारकिर्दीत चांदा, छत्तीसगढ, संबळपूर या प्रदेशांवरही भोसले घराण्याचे वर्चस्व प्रस्थापित झाले. दक्षिण भारतात कुड्डाप्पा आणि कर्नूलच्या नवाबांचा पराभव करून त्यांनी लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला.
अठराव्या शतकातील अत्यंत धाडसी मराठा सेनानी म्हणून ओळखले जाणारे रघुजी भोसले केवळ रणांगणावरच नव्हे, तर औद्योगिक संपत्तीच्या वापरातही पुढे होते. नागपूरकर भोसले घराण्याच्या भौगोलिक सीमांत लोखंड आणि तांबे यांसारख्या खनिजांचा मोठ्या प्रमाणावर साठा होता. यांचा उपयोग शस्त्रनिर्मितीत मोठ्या प्रमाणावर होत असे. त्यांच्या घराण्यातील राजशस्त्रे ही केवळ युद्धसामग्री नव्हती, तर सौंदर्य आणि कारागिरीचा अद्वितीय संगम मानली जात.
लंडन लिलावात झळकली रघुजी भोसल्यांची ‘फिरंग’ तलवार
आज लंडन येथे लिलावात आलेली रघुजी भोसले यांची तलवार ही मराठा शैलीतील ‘फिरंग’ पद्धतीच्या शस्त्रकलेचा उत्कृष्ट नमुना मानली जाते. सरळ, एकधारी पाते आणि मुल्हेरी घाटाच्या सोन्याच्या नक्षीकाम केलेल्या मूठीमुळे ही तलवार विशेष उठून दिसते. तलवारीचे पाते हे युरोपीय बनावटीचे असून, पात्याच्या खजान्याजवळ ते तयार करणाऱ्या कंपनीचे नाव कोरलेले आहे. अशा प्रकारची युरोपीय पाती मध्ययुगीन भारतातील उच्चवर्गीयांमध्ये अत्यंत लोकप्रिय होती. पात्याच्या पाठीवर, तळाजवळ देवनागरी लिपीत सोन्याच्या पाण्याने कोरलेला “श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा फिरंग” हा शिलालेख या तलवारीचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करतो. हा लेख या तलवारीचा थेट रघुजी भोसले यांच्याशी संबंध असल्याचा ठोस पुरावा मानला जातो. तलवारीच्या मुल्हेरी मुठीवर सोन्याच्या पाण्याने ‘कोफ्तगरी’ शैलीतील नाजूक नक्षीकाम केलेले आहे. तसेच, उभट मुसुमेला हिरव्या रंगाचे कापड गुंडाळलेले असल्याने तिचे सौंदर्य आणखी खुलते. शस्त्रनिर्मितीतील कलात्मकता आणि ऐतिहासिक वारसा या दोन्ही गोष्टींचा अद्वितीय संगम ही तलवार दर्शवते.
मराठा साम्राज्याच्या लष्करी वैभवाचे प्रतीक मानली जाणारी रघुजी भोसले प्रथम यांची ‘फिरंग’ तलवार अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कारणांनी विशेष ठरते. बहुतांश मध्ययुगीन मराठा शस्त्रांवर नक्षीकाम आढळत नसतानाच, या तलवारीवर अत्यंत सुबक सोन्याचे नक्षीकाम केलेले आहे. तसेच, त्या काळात शस्त्रांवर निर्माणकर्त्याचे किंवा वापरकर्त्याचे नाव कोरण्याची प्रथा जवळजवळ नसतानाही, या तलवारीवर देवनागरी लिपीत “श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा फिरंग” असा लेख सोन्याच्या पाण्याने कोरलेला आहे.
सन १८१७ मध्ये नागपूरकर भोसले घराण्याने सीताबर्डीच्या रणांगणावर ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध धाडसी लढा दिला. मात्र, या संघर्षात ब्रिटिश सैन्याला विजय मिळाल्यानंतर नागपूरकर भोसल्यांच्या खजिन्यावर कंपनीने हल्ला चढवला. खजिन्यातील सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तू, दागदागिने आणि दुर्मीळ शस्त्रसंपत्तीची मोठ्या प्रमाणावर लूट करण्यात आली. इतकेच नव्हे, तर नागपूरचे संस्थान ब्रिटिशांच्या अखत्यारीत (खालसा) गेल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीला वेळोवेळी नजराणे आणि भेटवस्तू देण्याची परंपराही सुरु झाली होती. इतिहासतज्ज्ञांच्या मते, रघुजी भोसले यांची ‘फिरंग’ तलवार या लुटीच्या मालामध्ये किंवा नंतर ब्रिटिशांना दिलेल्या अशाच एखाद्या औपचारिक भेटीत परदेशात गेली असण्याची शक्यता आहे.