कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त
विरार : मीरा भाईंदर- वसई विरार पोलिस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या नालासोपारा, वसई ,विरार परिसरात कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स व विविध अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. हा परिसर अमली पदार्थ खरेदी विक्री करण्याचा मोठा अड्डा बनला असून, या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता गावागावात आणि शहरात विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी याबाबत पोलिस आयुक्त निकेत कौशिक याच्यासोबत बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात
आला आहे.
मुंबई-अहमदाबाद हायवे, वसई-विरारच्या वाहतूक व वाढत्या गुन्हेगारीसंदर्भात मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्त कार्यालयात आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी बैठक घेतली. चिंचोटी, कामण, घोडबंदर रोड आणि मुंबई-अहमदाबाद हायवेवरील वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून, येत्या आठवड्यात रस्त्याचे दुरुस्तीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक डायवर्जन व नागरिकांना योग्य सूचना देण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून, अगोदरच नोटिफिकेशनद्वारे माहिती देणे, लाईट व हेवी व्हेइकलसाठी स्वतंत्र मार्ग नियोजित करणे, तसेच मार्गक्रमणाचे योग्य नियोजन करण्याचे
ठरवण्यात आले.
वसई-विरार परिसरातील ड्रग्सची खरेदी विक्री करण्याचे व प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ड्रग्स तसेच अमली पदार्थ विकणाऱ्यांविरुद्ध सतत कारवाई होत असते. गेल्या काही महिन्यांमध्ये पोलिसांकडून कोट्यावधी रुपयाचे अमली पदार्थ व ड्रग्स जप्त करण्यात आले. तरुण पिढीचा नाश करणाऱ्या बाबीला त्वरित आळा घालणे आवश्यक आहे. त्यामुळे विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार दुबे पंडित यांनी केल्या आहेत. १५ ऑगस्टनंतर पोलिस प्रशासन आणि सामाजिक संस्था यांच्यासोबत जनजागृती अभियान गावागावात राबवण्याबाबत या बैठकीत ठरविण्यात आले. आमदार स्नेहा दुबे पंडित, पोलिस आयुक्त निकेत कौशिक, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधाविनोद शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता गीते, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे तसेच सर्व ट्राफिक पोलीस अधिकारी
उपस्थित होते.