मुंबई : रक्षाबंधनाच्या अत्यंत भावूक आणि हृदयस्पर्शी सोहळ्यात, मुंबईच्या १६ वर्षीय अनामता अहमदने गुजरातमधील वलसाड येथील १४ वर्षीय शिवम मिस्त्रीच्या मनगटावर राखी बांधली. हे भावनिक कृत्य दोन कुटुंबांना कायमचे जोडून गेले, कारण अनामताला शिवमच्या दिवंगत बहिणी, रिया मिस्त्रीकडून हाताचे प्रत्यारोपण (hand transplant) मिळाले आहे. या कृतीतून हे स्पष्ट होते की, अवयवदान कसे चिरस्थायी वारसा आणि एक नवीन कौटुंबिक बंधन निर्माण करू शकते.
९ वर्षांची रिया ब्रेन-डेड घोषित झाल्यानंतर, अनामताला तिच्या हाताचे प्रत्यारोपण करण्यात आले आणि ती जगातील सर्वात कमी वयाची खांद्यापर्यंत हाताचे प्रत्यारोपण झालेली व्यक्ती बनली.
२०२२ मध्ये उत्तर प्रदेशात एका उच्च-तणावाच्या केबलच्या अपघातात अनामताने आपला उजवा हात गमावला होता. या आघातामुळे तिला शारीरिक आणि मानसिक धक्का बसला होता, तसेच तिच्या डाव्या हातालाही गंभीर दुखापत झाली होती. आता मिठीबाई कॉलेजमध्ये शिकणारी अनामता, सोशल मीडिया क्रिएटर आणि TEDx स्पीकर बनली आहे. ती आपल्या या घटनेचा उपयोग इतरांना संकटांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी करते.
भाऊ आणि बहिणीच्या पवित्र कर्तव्याचा सन्मान करणाऱ्या रक्षाबंधनाचा या दोन कुटुंबांसाठी एक नवीन अर्थ निर्माण झाला आहे, जो जीवन आणि त्यागाचा उत्सव म्हणून त्यांना एकत्र आणत आहे.
मानवतेची अनोखी गाथा
प्रेम, भावना आणि माणुसकीची साक्ष देणारा एक विलक्षण क्षण आज देशातील लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श करून गेला. सप्टेंबर २०२४ मध्ये, सूरत येथील किरण हॉस्पिटलमध्ये ९ वर्षांच्या रिया बॉबी मिस्त्रीला ब्रेन-डेड घोषित करण्यात आले. 'डोनेट लाईफ' या संस्थेच्या माध्यमातून तिच्या हातांचे दान करण्यात आले. अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुकलीने हातांचे दान करण्याची ही जगातील पहिलीच ऐतिहासिक घटना होती.
रियाच्या हातांनी अनामताला दिले नवे जीवन
रियाचा उजवा हात मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये डॉ. निलेश सातभाई यांनी १५ वर्षांच्या अनामता अहमदला यशस्वीपणे प्रत्यारोपित केला. गोरेगावची रहिवासी असलेल्या अनामताचा हात विजेच्या धक्क्याने खांद्यापर्यंत कापला गेला होता. या प्रत्यारोपणानंतर तिला केवळ नवीन जीवनच मिळाले नाही, तर दोन कुटुंबांमध्ये प्रेमाचे आणि आशेचे एक नवीन नाते निर्माण झाले.
'तिचा स्पर्श अजूनही आहे'
या रक्षाबंधनाला अनामता अहमदने वालसाड येथे जाऊन रियाचा भाऊ शिवमच्या मनगटावर राखी बांधली. हा क्षण सर्वांसाठी खूप भावूक होता. डोळ्यांत अश्रू आणि चेहऱ्यावर एक अनोखे समाधान घेऊन रियाचे कुटुंब हे दृश्य पाहत होते. "रिया गेली, पण तिचा स्पर्श अजूनही आहे," असे तिचे कुटुंब म्हणाले. "आज त्याच हातांनी शिवमच्या मनगटावर राखी बांधली गेली."
या घटनेमुळे रियाच्या आठवणी, भावना आणि प्रेम यांनी एक अतूट धागा विणला. वालसाड येथील आर.जे.जे. शाळेत १०वीत शिकणाऱ्या शिवमने अनामताच्या हातांना स्पर्श करून आपल्या बहिणीच्या स्पर्शाची पुन्हा एकदा जाणीव घेतली. तो म्हणाला, "असं वाटलं की रिया माझ्यासोबतच आहे." रियाचे आई-वडील, बॉबी आणि तृष्णा यांनीही आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, "असं वाटतंय रियाच आमच्याकडे परत आली आहे. तिची राखी, तिचा स्पर्श... सगळं काही जिवंत वाटतंय."
अनामता अहमदने रियाच्या कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ती म्हणाली, "ऑक्टोबर २०२२ मध्ये माझा उजवा हात विजेच्या धक्क्याने गमवावा लागला आणि माझ्या आयुष्यातील सर्व आशा संपली होती. पण रियाच्या हातांच्या प्रत्यारोपणानंतर मला जणू दुसरे जीवनच मिळाले आहे. आज मी त्याच हातांनी रियाच्या भावाला राखी बांधली. शिवमच्या रूपात मला एक भाऊ मिळाला आहे."
मानवता हाच खरा धर्म
'डोनेट लाईफ'चे अध्यक्ष निलेश मंडलेवाला म्हणाले, "हा केवळ रक्षाबंधनाचा उत्सव नाही, तर जगाला हा एक शक्तिशाली संदेश आहे की मानवता हाच सर्वात मोठा धर्म आहे." या प्रसंगी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनात कोणताही धर्म नव्हे, तर केवळ माणुसकीची भावना जागृत झाली होती.
'डोनेट लाईफ'च्या माध्यमातून आतापर्यंत १,३३६ अवयव आणि ऊतींचे दान झाले आहे. यात ५४२ मूत्रपिंड, २३५ यकृत, ५७ हृदय, ५२ फुफ्फुस, ९ स्वादुपिंड, ८ हात, १ लहान आतडे आणि ४३२ डोळ्यांच्या जोड्यांचा समावेश आहे. या दानांमुळे भारत आणि परदेशातील १,२३२ लोकांना नवीन जीवन मिळाले आहे.