Sunday, May 17, 2026

म्हाडा मुंबई मंडळातर्फे होणार १४९ अनिवासी गाळ्यांचा ई-लिलाव

म्हाडा मुंबई मंडळातर्फे होणार  १४९ अनिवासी गाळ्यांचा ई-लिलाव

नोंदणी व अर्ज प्रक्रियेला मंगळवारपासून प्रारंभ

मुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) मुंबईमधील विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी आयोजित ई-लिलावाकरिता ऑनलाईन नोंदणी व अर्ज प्रक्रियेला १२ ऑगस्ट, २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजेपासून प्रारंभ होणार आहे, अशी माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.

सदर लिलावात मुंबईतील मुलुंड गव्हाणपाडा येथे ०६ अनिवासी गाळे, कुर्ला- स्वदेशी मिल येथे ०५, तुंगा पवई येथे ०२, कोपरी पवई येथे २३, चारकोप येथे २३, जुने मागाठाणे बोरीवली पूर्व येथे ०६, महावीर नगर कांदिवली पश्चिम येथे ०६ अनिवासी गाळे, प्रतीक्षा नगर सायन येथे ०९, अँटॉप हिल वडाळा येथे ०३, मालवणी मालाड येथे ४६ अनिवासी गाळे, बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व येथे १७ अनिवासी गाळे व शास्त्री नगर-गोरेगाव, सिद्धार्थ नगर, मजासवाडी जोगेश्वरी पूर्व येथे प्रत्येकी ०१ अनिवासी गाळा विक्रीसाठी उपलब्ध आहे. २८ ऑगस्ट, २०२५ सकाळी ११.०० वाजेपासून सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली स्वरूपातील ई-लिलाव www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे. दि. २९ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता https://eauction.mhada.gov.in व https://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई मंडळातील अनिवासी गाळ्यांच्या ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी https://eauction.mhada.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम ऑनलाईन भरणे यासाठी दि. १२ ऑगस्ट, २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजेपासून ते दि. २५ ऑगस्ट, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा