Thursday, August 27, 2026

Raksha Bandhan : दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनवलेल्या २ हजारांहून राख्यांची विक्री

Raksha Bandhan : दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनवलेल्या २ हजारांहून राख्यांची विक्री

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या कल्पकतेने आणि स्वहस्ते साकारलेल्या राख्या घेऊन मुंबईकरांसमोर आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या विशेष शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मुंबईकरांनी मनापासून दाद दिली. महानगरपालिका मुख्यालयासह विविध प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राखी प्रदर्शनात या विद्यार्थ्यांनी तब्बल २ हजार ५२ राख्यांची विक्री केली. या विक्रीतून तसेच इतर वस्तूंच्या विक्रीतून ५१ हजार १९० इतकी रक्कम जमा झाली. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी केलेल्या विक्रीतून जमा झालेली ही रक्कम त्याच विद्यार्थ्यांना भेट म्हणून देण्यात आली, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा या उपक्रमाचे खरे यश ठरले.

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल तुर्डे यांच्या संकल्पनेतून आणि नियोजन विभागाच्या माध्यमातून रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर हे विशेष राखी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच महानगरपालिकेच्या विशेष शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा, हा या उपक्रमामागील उद्देश होता.

स्वहस्ते साकारलेल्या राख्यांना पसंती महानगरपालिकेच्या विविध विशेष शाळांमधील विद्यार्थ्यांनी आकर्षक आणि कल्पक राख्या स्वतः तयार केल्या होत्या. या राख्या विक्रीसाठी महानगरपालिका मुख्यालय तसेच विविध प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या. आपल्या भावंडांसाठी राखी खरेदी करण्यासाठी आलेल्या मुंबईकरांनी या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांना पसंती दिली.

राखी खरेदी करण्यासोबतच या विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याचे कौतुकही केले. २४ ऑगस्ट २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयासह विविध प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये १,२९९ राख्यांची विक्री झाली. त्यातून इतर वस्तूंसह एकूण ३१,४७५ रुपये इतकी रक्कम जमा झाली. तर २५ ऑगस्ट २०२६ रोजी विविध विभाग कार्यालयांमध्ये ७५३ राख्यांची विक्री झाली आणि इतर वस्तूंसह १९,७१५ रुपये इतकी रक्कम जमा झाली. अशा प्रकारे दोन दिवसांत एकूण २,०५२ राख्या विकल्या गेल्या.

राख्या विकल्या अन् मिळाले प्रोत्साहनाचे अनमोल बळ

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने तयार केलेल्या वस्तूंची विक्री स्वतः अनुभवली आणि त्यातून मिळालेल्या रकमेचे थेट प्रोत्साहनही त्यांना मिळाले. त्यांच्या कष्टाला मिळालेली ही आर्थिक दाद केवळ रकमेपुरती मर्यादित नसून, ‘आपल्या कलेला आणि मेहनतीला किंमत आहे’ हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करणारी ठरली. महानगरपालिका मुख्यालयात एस. जी. बारवे, लायन्स जुहू सेंटर आणि नारे पार्क या शाळांमधील विद्यार्थ्यांनी राख्यांची विक्री केली. त्याचप्रमाणे एम/पूर्व, डी, एफ/दक्षिण, जी/दक्षिण, जी/उत्तर, एच/पूर्व, एच/पश्चिम, के/पश्चिम, पी/दक्षिण, आर/दक्षिण, आर/मध्य, एफ/उत्तर, एल, एन, एस, टी आणि एम/पश्चिम या प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये महानगरपालिकेच्या विविध विशेष शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा