दहशतवाद्यांनी चकमक होण्याआधीच्या १७ दिवसांत दोन वेळा पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांशी बोलण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा वापर केला होता. अखेर दहशतवाद्यांची नेमकी स्थिती लक्षात आल्यावर सुरक्षा पथकांनी कारवाईची तयारी सुरू केली. श्रीनगरपासून काही किमी. अंतरावर असलेल्या दाचीगामच्या जंगलातील मुलनार येथे महादेव डोंगराजवळ लिडवास हे ठिकाण आहे. याच ठिकाणी दहशतवादी लपले होते. या भागात दीर्घकाळ लपणे शक्य आहे, यामुळे लवकर त्यांचा सुगावा लागला नही. पण सिग्नलच्या मदतीने सुरक्षा पथक दहशतवाद्यांचा माग काढू शकले.घेराव घालून दहशतवाद्यांची कोंडी करण्यात आली होती. पुरते अडचणीत सापडल्याची जाणीव होताच दहशतवाद्यांनी गोळीबार केला. चकमक झाली. या चकमकीत दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांकडून सुरक्षा पथकाने मोठा शस्त्रसाठा आणि चीनी बनावटीची संपर्क यंत्रणा यांची जप्ती केली.
सीमेवर पहारा असल्यामुळे दहशतवाद्यांना परत पाकिस्तानमध्ये जाणे कठीण झाले होते. यामुळे दहशतवादी डोंगराळ भागातील जंगलात लपले होते. ते वारंवार स्वतःची जागा बदलत होते. पाकिस्तानमध्ये संपर्क करण्यासाठी त्यांच्याकडून सॅटेलाइट फोनचा वापर सुरू होता. या फोनमुळेच दहशतवाद्यांना शोधणे सुरक्षा पथकांना सोपे झाले. पण मधल्या काळात काही दिवस दहशतवाद्यांनी सॅटेलाइट फोन बंद केला होता. ते कोणाशीही फोनद्वारे संपर्क करणे टाळत होते. यामुळे त्यांचा माग काढण्यास वेळ लागला. पण सुरक्षा पथकांची खात्री झाल्यावर इन्फ्रारेड ड्रोनच्या मदतीने जंगलात तपासणी करण्यात आली. उष्णतेच्या मदतीने मानवी अस्तित्वाची माहिती सांगणाऱ्या या ड्रोनने जंगलातील दहशतवाद्यांच्या लपण्याची जागा शोधण्यास सुरक्षा पथकाला मोलाची मदत केली होती. स्थानिकांनी दिलेली माहिती आणि तंत्रज्ञान यांच्या जोरावर दहशतवाद्यांच्या लपण्याचे नेमके ठिकाण शोधून सुरक्षा पथकाने धडक कारवाई केली.