मुंबई: मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर आता रेल्वे प्रशासनाने दिवा रेल्वे स्थानकात निवडक फास्ट लोकल थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. दिवा स्थानकावर जलद लोकल आतापर्यंत थांबत नव्हत्या, मात्र रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे दिवावासियांना मोठा दिलासा मिळणार आहे. दररोज १० फास्ट लोकल दिवा स्थानकावर थांबणार आहेत.येत्या सप्टेंबर महिन्यापासून हा बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे स्लो लोकलवरील ताण कमी होईल.
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ काही प्रवासी धावत्या लोकल ट्रेनमधून पडले होते. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर दिवा स्थानकाबाहेर प्रवासी संघटनेचे सदस्य उपोषणाला बसले होते. दिवा स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ज्यादा ट्रेन सोडाव्यात, सगळ्या फास्ट ट्रेनला दिव्याला थांबा देण्यात यावा , पनवेल ते दिव्यादरम्यान लोकल सेवा सुरू कराली आणि दिवा तसेच मुंब्रा स्थानकाबाहेर रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करून द्यावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते .
रेल्वे अधिकाऱ्यांनी आंदोलकांना सकारात्मक प्रतिसाद दिला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाने आंदोलकांना सांगितले की, उपनगरीय लोकल रेल्वेचे नवीन वेळापत्रक सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध होणार आहे. त्यामध्ये कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि टिटवाळा येथून निघणाऱ्या जलद लोकल गाड्यांना दिवा येथे थांबा देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय उर्वरीत दोन मागण्यांसंदर्भातली रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.
दरम्यान, दिवा प्रवाशांच्या मागण्यांवर इतर स्थानकांमधील प्रवाशांनी आक्षेप घेतला आहे. “जर कर्जत लोकल किंवा दूरवर जाणाऱ्या सर्व लोकल गाड्या दिवा येथे थांबल्या तर गोंधळ होईल आणि अधिक समस्या निर्माण होतील असे काही प्रवाशांचे म्हणणे आहे. कर्जत लोकल किंवा लांबून येणाऱ्या फास्ट ट्रेनला दिव्याला थांबा दिला तर ठाण्याला प्रवाशांना लोकलमध्ये चढणे मुश्कील होईल असे काही प्रवाशांचे म्हणणे आहे. दिव्याला फास्ट ट्रेन थांबल्या तर लोकलमधील गर्दी आणखी वाढेल असे प्रवाशांचे म्हणणे आहे. यापेक्षा दिव्याहून सुटणाऱ्या लोकलला प्राधान्य द्यावे असे इतर स्थानकातील प्रवाशांचे म्हणणे आहे.