सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा किंवा विविध रूपे डोळे भरून पाहण्याची प्रत्येक भाविकांची इच्छा असते. परंतु, गर्दीमुळे हे शक्य होत नाही. त्यामुळे भाविकांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मंदिर समितीने व्ही.आर. गॉगलद्वारे भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन, पूजा आदी पाहण्याची सोय उपलब्ध केली आहे.
व्ही.आर. दर्शन सुविधा सुरू करणारे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे राज्यातील पहिलेच मंदिर ठरले आहे.श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेसह दैनंदिन राजोपचार भाविकांना पाहायला मिळत नाहीत. ते पाहण्याची, अनुभवण्याची व्यवस्था व्ही.आर. गॉगलच्या माध्यमातून समितीने उपलब्ध केली आहे.
या सुविधेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री संत नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने दि. 22 जुलै रोजी प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आला. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो आणि प्रत्येक एकादशीला लाखो भाविक हजेरी लावतात. आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्र यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत येतात. त्यांना दैनंदिन नित्य पूजा व महापूजा पाहता याव्यात, देवाच्या गाभार्यात जाऊन महापूजेचा आनंद घेत असल्याचा आभास या व्ही.आर. गॉगलच्या माध्यमातून भाविकांना अनुभवता येणार आहे.