पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात लवकरच स्वमालकीच्या २०० नवीन सीएनजी बस दाखल होणार आहेत. सप्टेंबर २०२५ पासून ताफ्यात येण्यास सुरुवात होईल. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये प्रवास करणाऱ्या सुमारे दीड लाख प्रवाशांची सोय होणार आहे.
टाटा कंपनीकडून खरेदी करण्यात येणाऱ्या या बस लखनऊमधून पुण्यात आणल्या जाणार आहेत. पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच लखनऊमध्ये जाऊन यासंदर्भात पाहणी केली आहे. या बस खरेदी करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांनी पीएमपीला आर्थिक मदत केली आहे. प्रत्येक बसची किंमत सुमारे ४६ लाख रुपये आहे. नुकत्याच पीएमपीच्या ताफ्यात ४०० भाडेतत्त्वावरील नवीन सीएनजी बस दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. पैकी ३६० बस आत्तापर्यंत दाखल झाल्या असून, उर्वरित ४० बस चालू महिन्याच्या अखेरपर्यंत पीएमपीच्या ताफ्यात येतील. पीएमपीच्या प्रवासात आलेला विस्कळितपणा दूर होण्यास मदत मिळणार आहे.
''प्रवाशांना उत्तम आणि आरामदायी प्रवास सुविधा देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. या नवीन २०० सीएनजी बसमुळे पीएमपीच्या सेवेत नक्कीच सुधारणा होईल. त्यामुळे केवळ गर्दीच कमी होणार नाही, तर पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या बसमुळे प्रदूषण नियंत्रणासही मदत होईल. दोन्ही महानगरपालिकांच्या आर्थिक मदतीमुळे हे शक्य झाले आहे आणि आम्ही लवकरच या बस सेवेत दाखल करण्यासाठी उत्सुक आहोत.''
- नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल