भारत खोट्या चकमकी करत असल्याचा केला दावा
श्रीनगर: श्रावणी सोमवारी 'ऑपरेशन महादेव' द्वारे भारतीय सैन्याने पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोधून खात्मा केला आहे. ज्यामुळे तब्बल ९६ दिवसांनंतर पहलगाम हल्ल्यातील दोषी दहशतवाद्यांना मारण्यात भारतीय लष्कराला यश मिळाले आहे. ज्याचे सर्वत्र कौतुक होत असतानाच, नेहमीप्रमाणे पाकिस्तानने आपल्या अकलेचे तारे तोडले. या कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानने आपल्या देशाचे नागरिक असे म्हंटले खरे, पण मारली गेलेली ही सर्वजण निर्दोष असल्याचा दावा देखील केला.
काल सोमवारी, २२ एप्रिल रोजी भारतीय लष्कराने ऑपरेशन महादेव करत बैसरन खोऱ्यात २६ जणांची हत्या करणाऱ्या दहशतवादी टोळीचा नेता हाशिम मुसा उर्फ सुलेमान शाह याला ठार मारले. श्रीनगरच्या बाहेरील भागात हे ऑपरेशन सुरू होते, ज्यात भारताला चांगलेच यश आले.
पाकिस्तानचा खोटा दावा
पाकिस्तानने दावा केला आहे की, भारताने ५६ पाकिस्तानींना ताब्यात घेतले आहे. तसेच हे सर्व 'निर्दोष पाकिस्तानी नागरिक' असल्याचे त्याचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तर भारत त्यांचा बनावट चकमकींसाठी वापर करत असल्याचा आरोप केला आहे. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मुसा हा पाकिस्तानी सैन्याच्या एलिट युनिट स्पेशल सर्व्हिस ग्रुपचा माजी कमांडो आहे. लष्कराने सोमवारी त्याला ठार मारले.
लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी सुलेमान शाह पाकिस्तानी सैन्याचा माजी कमांडो
लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी सुलेमान शाह हा पाकिस्तानी सैन्याच्या एलिट युनिट स्पेशल सर्व्हिस ग्रुपचा माजी कमांडो आहे. सुलेमानने सप्टेंबर २०२३ मध्ये भारतात घुसखोरी केली आणि दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग घेतला होता. मात्र भारतीय लष्कराच्या या कारवाईत त्याच्यासह आणखी दोन दहशतवादी मारले गेले.
ऑपरेशन महादेवमध्ये ३ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आल्याने पाकिस्तान बिथरला
पाकिस्तानने म्हटले आहे की भारतीय एजन्सी चकमकीत ताब्यात घेतलेल्या पाकिस्तानींना मारत आहेत आणि त्यांना सीमापार दहशतवादी म्हणत आहेत. पाकिस्तानच्या सरकारी एजन्सी या दहशतवाद्यांना 'निर्दोष' आणि 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणत आहेत.
पाकिस्तानच्या इंग्रजी वृत्तपत्र 'डॉन'ने पाकिस्तानी सुरक्षा सूत्रांचा हवाला देत म्हंटले आहे की, "भारत ऑपरेशन महादेवच्या नावाखाली बनावट चकमकी करत आहे." या वृत्तपत्रामध्ये असे लिहिले आहे की, "भारतीय एजन्सी बनावट चकमकींमध्ये जबरदस्तीने ताब्यात घेतलेल्या कथित निष्पाप पाकिस्तानींचा वापर करण्याची आणि त्यांना सीमापार दहशतवादी जाहीर करण्याच्या तयारीत आहे." पण या बातमीत मारल्या गेलेल्या तिघांकडून भारतीय सैन्यांना मिळालेले सॅटेलाइट फोन, एक M4 कार्बाइन रायफल, दोन AK रायफल आणि इतर शस्त्रे नेमकी कुठून मिळाली? याचा उल्लेखच केलेला नाहीय.
७२३ पाकिस्तानी नागरिक भारतीय तुरुंगात बंद
पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद चौधरी शरीफ यांनी दावा केला आहे की ७२३ पाकिस्तानी नागरिक भारतीय तुरुंगात बंद आहेत. परंतु पाकिस्तानी लष्कराने हे ७२३ पाकिस्तानी नागरिक सीमा ओलांडून भारतीय हद्दीत कसे पोहोचले हे स्पष्ट केलेले नाही. डॉनने पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांमधील सूत्रांचा हवाला देत लिहिले आहे की, या ताब्यात घेतलेल्या लोकांना पाकिस्तानविरुद्ध विधाने करण्यास भाग पाडले जाऊ शकते.
पाकिस्तानचा बालिश युक्तिवाद
जिओ न्यूजने असा बालिश दावा केला आहे की भारतीय यंत्रणांनी चकमक झाली हे सिद्ध करण्यासाठी दहशतवाद्यांचे फोटो आणि शस्त्रे आधीच प्रसिद्ध केली.
जिओच्या मते, आयएसपीआरने त्यांच्या एका ब्रीफिंगमध्ये म्हटले होते की भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५६ पाकिस्तानींना ताब्यात घेतले आहे. परंतु हे पाकिस्तानी भारतीय सीमेवर कसे पोहोचले? यावर पाकिस्तानने मौन बाळगले आहे. तसेच पाकिस्तानच्या न्यूज चॅनल ३६५ प्लसने एका वृत्तात म्हटले आहे की भारताने आता ऑपरेशन महादेव सुरू केले आहे आणि या नावाखाली एन्काउंटरमध्ये ताब्यात असलेल्या 'निर्दोष' पाकिस्तानी लोकांचा वापर करत आहे. या चॅनलने म्हटले आहे की भारत ही कारवाई यशस्वी लष्करी कारवाई म्हणून सादर करत आहे.
सुलेमान, जिब्रान आणि हमजा अफगाणीचा खेळ संपला!
भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, २२ एप्रिलच्या हल्ल्याचा सूत्रधार मानला जाणारा सुलेमान उर्फ आसिफ, पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी वापरलेला सॅटेलाईट फोन पुन्हा वापरला जात असल्याचा संकेत सैन्याला मिळाल्यावर त्याच्यावर नजर ठेवण्यात आली. त्याचे ठिकाण माहीत झाल्यानंतर सैन्याने 'ऑपरेशन महादेव' ची धडक कारवाई केली. या कारवाईत मारले गेलेले इतर दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. जिब्रान हा गेल्या वर्षी सोनमर्ग बोगद्याच्या हल्ल्यात सहभागी होता तर, हमजा अफगाणी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हत्याकांडात सहभागी होता.