श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर येथे सुरक्षा पथकांनी ऑपरेशन महादेव राबवले. या ऑपरेशन अंतर्गत सुरक्षा पथकांनी ३ दहशतवाद्यांना ठार केले. गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा पथकांनी कारवाई केली. श्रीनगरमधील दाचीगाम राष्ट्रीय उद्यानाजवळील हरवान भागात चकमक झाली. या चकमकीत ३ दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये मुसा सुलेमानी आहे. हा मुसा सुलेमानी आधी पाकिस्तानच्या सैन्यात कार्यरत होता.
भारतीय सैन्याच्या चिनार कॉर्प्सने 'एक्स' अर्थात ट्विटरवर चकमकीची माहिती दिली आहे. तीव्र गोळीबारानंतर तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे. चकमक अद्याप सुरू आहे; असे चिनार कॉर्प्सने 'एक्स' अर्थात ट्विटरवर जाहीर केले. स्थानिक पोलीस ठाण्यानेही चकमकीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दोन वेळा गोळीबाराचा आवाज ऐकू आला. त्यानंतर अधिक कुमक पाठवण्यात आली. दहशतवाद्यांना मारण्यासाठी शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली; असे पोलिसांनी सांगितले.