"काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्राच्या मनात आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही.": देवेंद्र फडणवीस
मुंबई: ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६५ वा वाढदिवस साजरा झाला. यादरम्यान उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे अनेक वर्षानंतर मातोश्रीची पायरी चढले. ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरु असताना उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेणे, हे युतीचे संकेत असल्याचे बोलले जात आहे. ज्यावर अनेक राजकीय नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. मात्र आता, या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर प्रश्न विचारला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘उद्धवजींचा जन्मदिवस आहे, त्यांना शुभेच्छा द्यायला राज ठाकरे गेले होते ही आनंदाची गोष्ट आहे. आमच्याही शुभेच्छा उद्धव ठाकरेंना आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेल्यावर त्यात राजकारण पाहणं योग्य नाही.’
दोन्ही पक्षांच्या युतीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मनातलं घडेल असं म्हटलं होतं. याबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘राज्याच्या मनात काय आहे ते आपल्याला विधानसभा निवडणूकीत दिसलं आहे. आता महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीतही दिसेल. आता काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्राच्या मनात आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही.’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.