जिल्ह्यात मुसळधार पाऊस

  37

जनजीवन विस्कळीत


आज शाळा, महाविद्यालय बंद


पालघर : जिल्ह्यात दोन दिवसांपासून सर्वत्र पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान खात्याकडून पालघर जिल्ह्यासाठी शुक्रवारी ‘ऑरेंज अलर्ट’ शनिवारी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना २६ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. प्रमुख धरणे १०० टक्के भरल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


जिल्ह्यात आठ ते दहा दिवसापासून विश्रांतीनंतर दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून प्रमुख धरणे १०० टक्के भरली आहेत.परिणामी धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.


मोडकसागर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाची पाणी पातळी १६३.१६५ मीटर असून, ती पूर्ण संचय पातळी १६३.१५ मीटरच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत येथे ६५.०० मि. मी. पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत एकूण १८१७.०० मि. मी. पाऊस झाला आहे. सध्या धरणाची उपयुक्त पाणी साठवण क्षमता १०० टक्के झाली आहे. धरणाचा पाचवा दरवाजा ११ फूट उघडला असून, दरवाजा क्रमांक ४ हा ४ फूट उघडण्यात आला आहे. यातून १४ हजार १७८ क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे.


तानसा धरणही १०० टक्के भरले असून, उपयुक्त पाणी साठवण क्षमता १०० टक्के (१४५.०८ दशलक्ष घनमीटर) झाली आहे. धरणाची सध्याची पातळी १२८.५७७ मीटर असून, ती पूर्ण संचय पातळी १२८.६३ मीटरच्या जवळ आहे. गेल्या २४ तासांत ७३.०० मि. मी. पावसाची नोंद झाली असून, एकूण पर्जन्यमान १८१०.०० मि. मी. आहे. सध्या धरणाचे २१ दरवाजे उघडण्यात आले असून, २३ हजार २१०.४६ क्युसेक पाणी विसर्ग करण्यात येत आहे.


मध्य वैतरणा धरणदेखील ९० टक्क्यांहून अधिक भरले आहे. सध्या धरणाची पाणी पातळी २८२.५९ मीटर असून, उपयुक्त पाणी साठवण क्षमता ९२.५२% (१७९.०६७ दशलक्ष घनमीटर) आहे. गेल्या २४ तासांत येथे ४८.०० मि. मी. पावसाची नोंद झाली असून, एकूण पर्जन्यमान १९३२.०० मि. मी. आहे. धरणाचे गेट क्रमांक १, ३ आणि ५ हे प्रत्येकी २० सें.मी. ने उघडण्यात आले असून, त्यातून २ हजार १३ क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे. तसेच सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.




  • रेड अलर्टचा इशारा

  • प्रमुख धरणे १०० टक्के भरली

  • नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन


नवीन फळझाडांना आधार देण्याचा सल्ला


पावसाच्या या परिस्थितीमुळे जिल्हा कृषी हवामान केंद्राने शेतकऱ्यांना भात पुनर्लागवड पुढे ढकलण्याचा सल्ला दिला आहे. तसेच भात व नागली रोपवाटिकेतून पाण्याचा योग्य निचरा होण्याची व्यवस्था करावी.


नवीन लावलेली फळझाडे वादळी वाऱ्याने कोलमडून पडू नयेत यासाठी त्यांना काठीचा आधार देण्याचा सल्ला देण्यात आला असून, जुन्या आणि नवीन फळबागेतून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी आणि औषध फवारणी व खते देण्याची कामे टाळावीत, असे आवाहन करण्यात
आले आहे.


महामार्गावरील वाहतूक मंदावली


बऱ्याच दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने चांगलाच जोर धरला. त्यामुळे वातावरण प्रसन्न झाले असले तरी, कामावर जाणाऱ्या नागरिकांना मात्र याचा मोठा फटका बसला.


विशेषतः महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोंडीचा त्रास सहन करावा लागला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक सकाळपासूनच मंदावलेली दिसून येत होते. त्यामुळे दहिसर टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या भागात रस्त्यावर अनेक खड्डे असून, रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या कामांमुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी अधिकच तीव्र झाली होती, अशी तक्रार प्रवाशांनी केली. बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गर्दीत बराच वेळ एकाच ठिकाणी उभे राहावे लागत असल्यामुळे त्यांना या अडचणींना सामोरे जावे लागले.


रेल्वे वेळापत्रक विस्कळीत : मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण झाले होते. याचा परिणाम रेल्वे वाहतूकवरदेखील झाला. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गांवरील विरारहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत. यामुळे रेल्वे प्रशासनाचे वेळापत्रक विस्कळीत झाली, तर मिळेल त्या गाडीत चढून प्रवास करणाऱ्याची संख्या वाढल्यामुळे गर्दीची समस्या उभी राहिली होती.


सखल भागांत पाणी साचले : पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचल्याचे चित्र होते. विरार येथील विवा महाविद्यालय परिसर, साईनाथ नगर, बोळींज, ग्लोबल सिटी यासह नालासोपारा येथील अलकापुरी, गाला नगर, संकेश्वर नगर आणि रेल्वे स्थानक परिसरांत पाणी साचले. तसेच, वसईतील माणिकपूर, वसई गाव, बंगाली नाका, देवतलाव आणि नायगाव पूर्वेकडील स्टार सिटी, रिलायबल, सनटेक यांसारख्या विविध ठिकाणीही पाणी भरले होते. विविध ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती.

Comments
Add Comment

जिल्ह्याची कृषिप्रधान ओळख मिटण्याची चिन्हे

वसंत भोईर वाडा : शासनाच्या शेतीकडे पाहण्याच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील पारंपरिक शेतीव्यवसाय अडचणीत आला

अवैध बांधकामांना माजी आयुक्तच जबाबदार

‘ईडी’ कार्यालयाकडून भांडाफोड विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या घोटाळ्यामध्ये अनिलकुमार पवार

वसईत 'भूतांचा' अनोखा आंदोलन: स्मशानभूमी वाचवण्यासाठी प्रयत्न!

मुंबई : मुंबईपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या वसईत, स्थानिकांनी एका अनोख्या आणि सर्जनशील पद्धतीने

घोडबंदर ते तलासरी महामार्ग धोकादायक स्थितीत

तातडीने लक्ष द्यावे अशी खासदारांची मागणी वाडा : पालघर लोकसभा मतदारसंघातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८

प्रियकरासोबत रंगेहाथ सापडल्याने पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक

घरातच गाडले, भावानेच घरातील फरशा बदलल्या नालासोपारा : नालासोपारा येथे प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले गेल्यानंतर

रोज ५० लाख लिटर पाणी, तरी टँकरवर मदार

महापालिका करणार पाण्याचा हिशोब विरार : टँकरमाफीयांना फायदा व्हावा म्हणून महापालिकेकडून होत असलेला पाणीपुरवठा