रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात येत्या २३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज असून नदीकाठी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या कोकणातील तिन्ही जिल्ह्यांना आगामी काही दिवसांत जोरदार पावसाचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
विशेषतः २३ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांतील रहिवाशांनी सतर्क राहावे, असे प्रशासनाचे आवाहन असून, पर्यटकांनी समुद्रात जाणे टाळावे, असेही स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांचे पाणीपातळी वाढली असून, काही ठिकाणी नदी व धरणे भरून वाहू लागली आहेत. शुक्रवारपर्यंत पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर शनिवारी व रविवारी जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर धरला.
काही भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून, अनेक ठिकाणी घरांना व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही घरांच्या भिंती कोसळल्याच्या, तसेच पाण्यामुळे जनावरांचे व शेतीचे नुकसान झाल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. दरम्यान, या दमदार पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, भात लावणीला मोठा वेग मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३६ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर भात लावणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.