लातूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर छावा संघटनेच्या कार्यकत्यांनी रविवारी सायंकाळी पत्ते फेकल्याने राडा झाला होता. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देणाऱ्या छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना बेदम मारहाण केली होती.
लातूर येथील अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून सुरुवातीला जनरल वाॅर्डमध्ये उपचार सुरू होते. सोमवारी दुपारी त्यांना श्वासोेछ्वासाचा त्रास होत असल्याने व त्यांच्या छातीत तीव्र वेदना होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. मनोज कदम यांनी दिली. मारहाण झाल्यानंतर घाडगे यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावर तेथील एका रूममध्ये उपचार सुरू होते. त्यांचे डोके, भुवया व डोक्याला मार लागला आहे. बरगड्या व पाठीच्या मणक्यालाही दुखापत झाली आहे.