पुणे: महामेट्रोने खंडुजीबाबा चौक ते महापालिका या दरम्यान मुठा नदीतून मेट्रोमार्ग नेला आहे. त्यामुळे हा मार्ग नारायणपेठ, शनिवार पेठेशी जोडला गेला पाहिजे यासाठी वर्तक उद्यान आणि भिडे पूल या ठिकाणी पादचारी पूल उभारणीचे काम सुरु आहे. भिडे पूल मे महिन्यापासून वाहतुकीसाठी बंद असल्याने वाहनचालकांना मोठा वळसा घालून जावे लागत आहे. तर पादचाऱ्यांचीही अडचण झाली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात भिडे पूल वाहतुकीसाठी बंद असल्यास मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावर आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्टीकरण दिले.मुळा नदीपात्रातील वाहतुकीसाठी बंद असलेला भिडे पूल गणेशोत्सवापुर्वी म्हणजेच २० ऑगस्टपर्यंत सुरू केला जाईल असे सांगितले.
शहराच्या पश्चिम उपनगरांमधील बहुतांश दुचाकी वाहतूक नदीपात्रातील रस्त्यावरून भिडे पुलावरून शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये येते. दररोज सुमारे अडीच ते तीन लाख दुचाकींची या रस्त्यावर वर्दळ असते. पावसाळ्यात केवळ मुठा नदीला पाणी सोडण्यात आल्यानंतरच हा रस्ता बंद केला जातो. मात्र, मेट्रोच्या पादचारी पुलासाठी भिडेपूल बंद करण्यात आला होता.