नाशिक: संजय राऊत यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना मंत्री छगन भुजबळ यांनी खोचक टोला लगावला आहे. उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी एक ट्विट करत,. चार मंत्री घरी जाणार आहेत, असा दावा केला होता. राऊतांच्या या दाव्यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. छगन भुजबळ यांनी त्यावर प्रत्युत्तर देताना आम्ही पण आता घरीच चाललो आहोत, असा उपरोधिक टोला लगावला.
आज मंत्री छगन भुजबळ यांनी द्वारका सर्कलची पाहाणी केली, यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. "द्वारका सर्कल परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडी सुरळीत करण्याची जबाबदारी ट्रॅफिक पोलिसांवर आहे, खूप लहान गोष्टी आहेत पोलिसांना थोडं ट्रेनिंग दिलं तर अडचणी दूर होतील, कुठे अडचणी येऊ शकतात त्याबद्दल त्यांनी सांगितले, आमची कल्पना सांगितली, मोठे ब्रीज आहेत, त्यांना पिलर आहेत, त्यामुळे अडचणी टाळून रस्ता करावा लागेल असं भुजबळ यांनी म्हटलं आहे." या दरम्यान त्यांनी राजकीय घडामोडीवर देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या. माणिकराव कोकाटे यांचे रमी प्रकरणापासून ते संजय राऊत यांच्या ट्विटपर्यंत आपले मत व्यक्त केले.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला, आणि राजकीय वातावरण चांगलंच तापलं, विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. यावर देखील भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांची मागणी आहे, त्यावर मी काही बोलणार नाही, मला काही कल्पना, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोरच छावाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली होती. याबाबत भुजबळ यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळलं आहे. मला काही माहीत नाही, जे झाले ते पाहिले आहे त्यांनी सांगितले, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
हनी ट्रॅप संबंधित वडेट्टीवारांचा मुद्दाही पत्रकारांनी उपस्थित केला असता, भुजबळ म्हणाले, की मी या मताशी सहमत नाही. नाशिकमधील पंचतारांकित हॉटेल ‘सील’ केल्याच्या चर्चेबद्दलही आपणास काही माहिती नाही.