नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी इंग्लंड (United Kingdom / UK) आणि मालदीवचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान कीर स्टारमर यांच्याकडून आलेल्या आमंत्रणाचा स्वीकार करत पंतप्रधान मोदी २३ आणि २४ जुलै असा दोन दिवसांचा इंग्लंडचा दौरा करणार आहेत. हा पंतप्रधान मोदींचा सरकारी दौरा आहे. पंतप्रधान झाल्यापासूनचा मोदींचा हा चौथा इंग्लंड दौरा आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्याकडून आलेल्या आमंत्रणाचा स्वीकार करत २५ आणि २६ जुलै असा दोन दिवसांचा मालदीव दौरा करणार आहेत. पंतप्रधान झाल्यापासूनचा मोदींचा हा तिसरा मालदीव दौरा आहे.
परदेश दौऱ्यात पंतप्रधान मोदी द्विपक्षीय संबंधांबाबत इंग्लंडच्या नेत्यांशी चर्चा करतील. प्रादेशिक आणि जागतिक सहकार्याबाबत चर्चा होईल. व्यापार, अर्थव्यवस्था, संशोधन, औद्योगिक सहकार्य, संरक्षण, सुरक्षा, पर्यटन, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण आदी विषयांतील सहकार्याबाबतही चर्चा होईल.
पंतप्रधान मोदी २६ जुलै २०२५ रोजी मालदीवच्या साठाव्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असतील. मालदीवच्या नेत्यांशी पंतप्रधान मोदी द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा करतील. व्यापक आर्थिक आणि सागरी सुरक्षा सहकार्य या विषयाबाबतही चर्चा होणार आहे.