मुंबई : अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने एका मुलाखतीदरम्यान तिच्या करिअरमधील एका कटू अनुभवाचा खुलासा केला आहे. स्टार प्रवाहवरील 'एक नंबर' या मालिकेसाठी ऑडिशन दिल्यानंतर तिला नाकारण्यात आले, कारण ती मुख्य अभिनेत्रीपेक्षा 'जास्त सुंदर' दिसत होती. 'एक नंबर' ही मालिका २०१२ मध्ये टीव्हीवर आली. या मालिकेत तिला मुख्य अभिनेत्रीच्या बहिणीची भूमिका ऑफर करण्यात आली होती.
जान्हवीने सांगितले की, ऑडिशन प्रक्रियेदरम्यान तिला अनेकदा बोलावण्यात आले. तिने विविध लूक टेस्ट आणि ऑडिशन्स दिल्या, पण शेवटी तिला नाकारण्यात आले. "मी चांगली दिसते म्हणून तुम्ही मला काढून टाकत आहात, ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली," असे ती म्हणाली. तिच्या डोळ्यांमुळे तिला अनेकदा नकारात्मक भूमिका ऑफर केल्या जातात, असेही तिने नमूद केले.
करिअरमधील आव्हाने आणि शिकलेले धडे
जान्हवीने आपल्या करिअरमधील काही प्रमुख आव्हानांवरही प्रकाश टाकला. 'भाग्य दिले तू मला' या मालिकेने तिला लोकांसोबत कसे वागावे आणि एक कलाकार म्हणून काय सुधारणा करावी हे शिकवले, असे तिने सांगितले. तसेच, तिच्या आवाजावरून तिला अनेकदा टीका सहन करावी लागली आहे. तिच्या नाकातून बोलण्याच्या पद्धतीवर तिला काम करावे लागले आणि आता ती कोणताही सीन करताना तिच्या आवाजाकडे विशेष लक्ष देते.
जान्हवी किल्लेकरचे काम
बिग बॉसमधून प्रचंड प्रसिद्धी मिळवल्यानंतर जान्हवी स्टार प्रवाहच्या 'अबोली' मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसली. यापूर्वी तिने 'आई माझी काळूबाई' या मालिकेतून लोकप्रियता मिळवली होती. तिचे 'कोळीवाडा झिंगला' हे गाणेही खूप गाजले आहे.जान्हवीने इंडस्ट्रीतील अशा अनेक कलाकारांप्रमाणेच नकाराचा आणि संघर्षाचा सामना केला आहे, पण तिने आपल्या कामातून आणि अनुभवातून खूप काही शिकल्याचे दिसते.