विरार (गणेश पाटील) : वसई आणि नालासोपारा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने अनपेक्षित यश मिळवले. तसेच आता वसई-विरार महापालिकेत भाजपचा पहिला महापौर विराजमान व्हावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भागावर स्वतःच लक्ष केंद्रित केले आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना महापालिकेत सत्तेची फळे चाखायला मिळावी म्हणून वसई-विरारमध्ये विकासगंगा वाहण्याच्या दृष्टीने 'देवाभाऊं'नी खूप आधीच पेरणी केली आहे.
गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात चांगले यश मिळाले नाही. मात्र पालघर लोकसभा मतदारसंघात डॉ. हेमंत सवरा यांच्या रूपाने भाजपचे खासदार निवडून आले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पालघर जिल्ह्यात डहाणू मतदारसंघ सोडला, तर उर्वरित पाचही विधानसभा मतदारसंघ महायुतीने जिंकले. विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे तीन गड महायुतीच्या उमेदवारांनी जिंकल्यामुळे वसई, नालासोपारा आणि बोईसर या तिन्ही मतदारसंघाकडे भाजप प्रदेश आणि मुख्यमंत्र्यांकडून अधिक लक्ष दिले जात आहे.
वसई-विरार शहर महापालिकेत 'प्रचंड बहुमत' हा शब्द खरोखर लागू पडेल, एवढे बहुमत बहुजन विकास आघाडीला यांपूर्वीच्या निवडणुकांमध्ये मिळाले आहे. ११५ संख्या असलेल्या या पालिकेत १०८ नगरसेवक बहुजन विकास आघाडीचे असताना एका नगरसेवकाच्या रूपाने भाजपला केवळ खाते उघडता आले. ही परिस्थिती बदलून महापालिकेत सत्ता असल्याशिवाय तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय मिळणार नाही, त्यामुळे या महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी 'देवाभाऊं'नी प्रयत्न चालविले आहेत. यावर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री पालघरला आले. याच दिवशी त्यांनी वसई आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. स्नेहा पंडित या दुबे होण्यापूर्वीपासूनच आदिवासी बांधवांसाठी, सामान्य नागरिकांसाठी कशा झटल्या, तसेच विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वसई विधानसभेच्या विजयाची खडतर वाट संघर्ष करीत त्यांनी पार केली. हे सांगताना त्यांनी त्या खऱ्या 'संघर्षकन्या' असल्याचे सांगितले.
याच सभेत त्यांनी पालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी कामाला लागण्याचे आदेशही भाजप पदाधिकाऱ्यांना दिले. आचोळे येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा तिढा सोडविण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांना बैठक घेण्याचे निर्देश, ४१ इमारती पडल्याने बेघर झालेल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत अभ्यास करण्यासाठी सचिवांना निर्देश दिले. वसई आणि नालासोपाऱ्याच्या आमदारांकडून कोणत्याही समस्या सोडविण्याबाबत मागणी आल्यास त्या तातडीने सोडविण्यासाठी 'देवाभाऊ' प्राधान्य देतात. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना व्यस्त वेळेतही त्यांनी बोटावर मोजण्या इतक्याच स्थानिक स्वराज्य संस्थांचा विशेष आढावा घेण्यासाठी बुधवारी विधान भवनातील कक्षात विशेष बैठक घेतली.
वसई-विरार महापालिका क्षेत्रातील सर्वात मोठ्या ओसी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासोबतच महापालिकेच्या ११६ शाळांचे हस्तांतरण, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे हस्तांतरण, यासह अनेक विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केवळ निर्देशच दिले नाहीत, तर आगामी कॅबिनेट मीटिंगमध्ये सर्व विषय ठेवण्याबाबत आदेशसुद्धा दिले आहेत. मुख्यमंत्री म्हणून राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी फडणवीस हे कुठेही कमी पडत नसताना, सामान्य कार्यकर्ता ही सत्तेत असावा यासाठी 'देवाभाऊ' म्हणून सुद्धा ते सतत प्रयत्नरत आहेत, हे वसई-विरारच्या विकासासाठी त्यांच्याकडून होत असलेल्या अनेक उदाहरणांवरून दिसून येत आहे.