नवी दिल्ली: शुभांशू शुक्ला यांचा स्टेम सेल प्रयोग केवळ अंतराळवीरांच्या आरोग्यासाठीच नाही तर कर्करोगासारख्या गंभीर आजारांच्या उपचारांमध्येही आशेचा किरण बनणार आहे. त्यांचा हा प्रयोग पृथ्वीवर जर राबवला तर त्यामुळे लाखो रुग्णांचे प्राण वाचवणे शक्य ठरेल. शिवाय यामुळे केवळ भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवीन ओळख मिळणार नाही तर त्यामुळे वैद्यकीय शास्त्रात क्रांती घडू येईल.!
इस्रोचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) एक अनोखा प्रयोग केला, जो कर्करोगाच्या उपचारात क्रांती घडवू शकतो. शुभांशू २५ जून २०२५ रोजी अॅक्सिओम मिशन ४ (AX 4) चा भाग म्हणून स्पेसएक्सच्या फाल्कन ९ रॉकेटवरून अवकाशात गेले. त्यांच्या १८ दिवसांच्या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक वैज्ञानिक प्रयोग केले, ज्यामध्ये स्टेम सेल्सवरील संशोधन सर्वात महत्वाचे मानले जाते.
कर्करोगाच्या उपचारात हा प्रयोग कसा मदत करू शकतो? हे जाणून घेऊया.
स्टेम सेल म्हणजे काय?
स्टेम सेल्स आपल्या शरीरातील मूलभूत पेशी आहेत, ज्या नवीन पेशींमध्ये बदलू शकतात. या पेशी शरीराच्या कोणत्याही भागाची दुरुस्ती करण्यास मदत करू शकतात जसे की हाडे, स्नायू किंवा रक्त. पृथ्वीवरील प्रयोगशाळेत त्यांची वाढ करणे कठीण आहे, परंतु अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण (कमी गुरुत्वाकर्षण) मध्ये, या पेशी जलद वाढतात आणि चांगले काम करतात.
शुभांशू शुक्ला यांचा अंतराळ प्रयोग
शुभांशू यांनी आयएसएसच्या किबो प्रयोगशाळेतील लाईफ सायन्सेस ग्लोव्हबॉक्स या स्वच्छ आणि प्रदूषण विरहित ठिकाणांमध्ये स्टेम सेल्सवर काम केले. त्यांचे निरीक्षण शून्य गुरुत्वाकर्षणात स्टेम सेल्स कसे वागतात यावर होते. काही पूरक जोडून त्यांचा कर्करोगावर उपचार करण्यासाठी वापर करता येईल का? हे यात पाहिले गेले. या प्रयोगात, त्यांनी स्नायू पेशी (मायोजेनेसिस) चा देखील अभ्यास केला, ज्यामुळे अंतराळवीरांच्या स्नायूंचे होणारे नुकसान टाळता येणे शक्य होईल.
याशिवाय, शुभांशू यांनी "कॅन्सर इन LEO-3" नावाच्या आणखी एका कर्करोगाशी संबंधित प्रयोगात भाग घेतला. या प्रयोगात, ट्रिपल-निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर (कर्करोगाचा एक धोकादायक प्रकार) च्या पेशींची अंतराळात चाचणी करण्यात आली. यात असे निदर्शनास आले आहे की, या पेशी अवकाशात वेगाने वाढतात. आणि औषधांनादेखील त्यांचा प्रतिसाद हा वेगळा पाहायला मिळाला. यामुळे त्यावर नवीन औषधे आणि उपचारांच्या शक्यता वाढू शकतात.
कर्करोगावर उपचार करण्यात हे कसे मदत करेल?
- पेशींची जलद वाढ: अंतराळात स्टेम पेशी तीन पट वेगाने वाढतात. यामुळे शास्त्रज्ञांना कर्करोगाची प्रगती लवकर समजते. नवीन औषधांची चाचणी करणे सुलभ जाते.
- औषधाचा शोध: फेड्रेटिनिब आणि रेबॅसिनिब या दोन औषधांची प्रयोगात चाचणी घेण्यात आली, जी कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवू शकतात. जर हे पृथ्वीवर काम करत असतील तर कर्करोगाच्या रुग्णांसाठी एक नवीन उपचार शोधता येईल.
- प्रतिकारक्षमता : अवकाशातील स्टेम पेशींचे वृद्धत्व आणि रोगप्रतिकारक शक्तीवर होणारा त्यांचा परिणाम अभ्यासण्यात आला. यामुळे कर्करोगाशी लढण्याची क्षमता वाढण्यास मदत होऊ शकते.
- ३डी मॉडेल: अवकाशात बनवलेल्या ३डी पेशी संरचनांमुळे पृथ्वीवरील कर्करोगाचे वर्तन समजून घेण्यास मदत होईल, ज्यामुळे उपचार अचूक होऊ शकतात.
अंतराळात प्रयोग करण्याचे कारण
पृथ्वीपेक्षा अवकाशातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात पेशी वेगळ्या पद्धतीने वाढतात. गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे, पेशी जमा होण्याची समस्या येत नाही, ज्यामुळे त्यांची गुणवत्ता सुधारते. हा प्रयोग पृथ्वीवर अशक्य होता, म्हणून ते आयएसएसद्वारे शक्य करण्यात आले. याबद्दल शुभांशू म्हणाले की, हे संशोधन करणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. कारण हा प्रयोग भारत आणि जागतिक विज्ञानाला एकत्र जोडणारा दुवा म्हणून काम करत आहे.
आव्हाने आणि भविष्य
या प्रयोगात अनेक आव्हाने देखील आहेत. अंतराळातील किरणोत्सर्गामुळे स्टेम पेशींचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. शास्त्रज्ञांना हा धोका कमी करण्याचा मार्ग शोधावा लागेल. तरीही, जर ते यशस्वी झाले, तर भविष्यात अंतराळात स्टेम सेल कारखाने बांधता येतील, जे कर्करोग आणि इतर आजारांसाठी पेशी पुरवतील.