मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा शेवटचा दिवस होता. त्यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना जाहीर ऑफर दिली. त्या आधी या दोन्ही नेत्यांची सभागृहाबाहेरही भेट झाली होती. आधी सभागृहाच्या परिसरात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली आणि नंतर सभागृहात फडणवीसांनी केलेल्या एका जाहीर वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना ऑफर
देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना थेट सभागृहात ऑफर दिली आहे. आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप २०२९ पर्यंत नाही, मात्र तुम्हाला मात्र इकडे येण्याचा स्कोप असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या या वक्तव्याचे आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याचा स्कोप
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धवजी आता २०२९ पर्यंत काही करायचं नाही. आम्हाला तिकडे यायचा स्कोप उरला नाही. मात्र तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे. त्यावर वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल. आपण वेगळ्या पद्धतीने बोलू.
महाराष्ट्र व तेलंगणा सीमाभागातील ही गावं चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरु मुंबई: दशकांपासून सुरू असलेला आंतरराज्य सीमा प्रश्न ...
अंबादास दानवे कट्टर सावरकरवादी
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत आला आहे. अनिल परब तुम्ही आता तयारी करा. दानवे वेगवेगळे योग जुळवून आणतात. हिंदुत्ववाची कडवट भूमिका घेणारा कार्यकर्ता म्हणजे दानवे आहेत. भोंग्यानविरोधात त्यांनी अनेक निवेदनं दिली. ते कट्टर सावरकरवादी आहेत. जरी ते बंटी पाटील यांच्या बाजूला ते बसले असतील तरीही ते सावरकरांचे भक्त आहेत."
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "अंबादास दानवे हे मूळचे भाजपच्या मुशीत घडलेले कार्यकर्ते. हिंदुत्ववाची कडवट भूमिका घेणारे आणि कट्टर सावरकरवादी कार्यकर्ते म्हणजे दानवे. पण जागावाटपात विधानपरिषदेची जागा शिवसेनेला गेली. मग दानवेंना शिवसेनेत जावं लागलं."
मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणाचा हाच संदर्भ घेऊन उद्धव ठाकरे म्हणाले की, "भाजपच्या आणि संघाच्या मुशीत घडलेला असा अंबादास दानवे हा कार्यकर्ता आम्हाला दिला याबद्दल मी मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानतो. मात्र त्यांनी माझ्याकडून घेतलेल्या नेत्यांबद्दल मुख्यमंत्री माझे आभार मानू शकतील की नाही याबद्दल शंका आहे."