"पक्षात दिवाळी, माझ्या घरात अंधार": महाजन यांची खंत
भाजप खासदार नारायण राणे यांच्यासोबत झालेल्या शाब्दिक वादात पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आपली जाहीरपणे बाजू घेतली नाही, अशी खंत महाजन यांनी व्यक्त केली. "मी नाराज नाही, पण खिन्न आणि दुःखी आहे," असे ते म्हणाले. शिबिरासाठी न बोलावल्याबद्दल ते म्हणाले, "प्रवक्त्यांना बोलावलं नाही. इतर प्रवक्ते आहेत, त्यांच्याकडे इतर पदांची जबाबदारी असेल, माझ्याकडे नाही. त्यामुळे मला निमंत्रण आले नाही."
महाजन यांनी आपली भावना व्यक्त करताना म्हटले, "घरच्या लोकांसमोर तोंड राहिले नाही. मी इतर कुणावर नाही तर माझ्यावरच नाराज आहे. प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला अभिमान वाटेल असेच काम मी प्रवक्ता म्हणून केले. भविष्यात ते अभिमानाने म्हणतील की, प्रकाश महाजन नावाचा प्रवक्ता आमच्याकडे होता."
दोन भावांच्या (राज आणि उद्धव) युतीबाबत केलेल्या वक्तव्यामुळेच आपल्याला त्रास झाल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित करत ते म्हणाले, "दोन भाऊ एकत्र आले तर माझा फायदा काय आणि नुकसान काय? भाऊ नसण्याचं काय दुःख आहे, हे मला माहीत होतं. ते एकत्र यावे ही मी भावना बोलून दाखवली. ही भावना चुकली असेल पण, पक्षात दिवाळी आहे (शिबिर सुरू आहे) आणि माझ्या घरात अंधार, अशी सध्या स्थिती आहे. माझे बोलणे, माझा मीडियातला वावर मला त्रासदायक ठरला."
"घरातच मान नाही तर..." डोळ्यात पाणी!
"मला आता वाटतंय, बस झालं, आपल्याला घरातच मान नाही तर इतर ठिकाणी काय मिळणार?" असे म्हणत प्रकाश महाजन यांच्या डोळ्यात पाणी आले. "अशा पद्धतीने पक्ष मला वागवत असेल, तर मी कोणत्या तोंडाने पक्षाची बाजू मांडू?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला. फेसबुकवर येणाऱ्या प्रतिक्रिया आणि नसलेले आरोप आपल्यावर टाकले जात असल्याने आपण गेल्या तीन-चार दिवसांपासून अस्वस्थ असल्याचेही महाजन यांनी नमूद केले.
प्रकाश महाजन यांच्या या भावनिक आणि थेट विधानांमुळे मनसेतील अंतर्गत नाराजी आणि 'भिडणाऱ्या' नेत्यांना होत असलेल्या 'साईडलाईन'ची चर्चा आता राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.