मनसेचे प्रदेश स्तरावरील शिबिर सुरू, निवडक पदाधिकारी उपस्थित बंद दाराआड चर्चा
इगतपुरी : आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच शिवसेनेसोबत (उबाठा) युती करावयाची की नाही, याबाबत मनसेच्या राज्यस्तरीय शिबिरात चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानुसार शिवसेनेसोबत युतीबाबत नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात निर्णय करू, असे सुतोवाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्याचे समजते. इगतपुरी येथील कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबिराला सुरुवात झाली. या शिबिरामध्ये मनसेचे काही निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या शिबिरामध्ये प्रसिद्धी माध्यमांना सहभागी करून न घेता सुरुवात झाली असून राज्यातून शेकडो पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत.
इगतपुरीमध्ये सर्वात जास्त पाऊस पडत असताना देखील या पावसाच्या मोसममध्ये कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये मात्र गरमागरम वातावरण आहे. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुन्हा एकदा बंद दाराआड खलबते शिजत असून या खलबत्त्यात नक्की काय आहे, याबाबतची माहिती मात्र बाहेर पडू नये याची पूर्णपणे काळजी घेतली जात आहे. राज्यभरातून जिल्हाप्रमुख पक्षाचे प्रदेश स्तरावरील नेते आणि काही निवडक पदाधिकाऱ्यांना सहभागी करण्यात आलेला आहे.
या शिबिरासाठी पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे हे दुपारी दाखल झाले तर पक्ष अध्यक्ष राज ठाकरे हे चार वाजेच्या सुमारास इगतपुरीमध्ये दाखल झाले. त्यानंतर येथील बैठकांना सुरुवात झाली. त्यापूर्वी सर्व पदाधिकारी हे या ठिकाणी दाखल झालेले होते. 16 जुलैपर्यंत हे शिबिर या ठिकाणी सुरू राहणार आहे. शिबिरासाठी कुठल्याही प्रकारची बॅनरबाजी किंवा प्रसिद्धी करण्यात आलेली नाही. प्रसिद्धी माध्यमांना देखील या शिबिरापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लांबच ठेवलेले आहे.