मुंबई : झी मराठी लवकरच एक नवीन आणि दमदार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे, ज्याचं नाव आहे 'तारिणी'. या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सोनार मुख्य भूमिका साकारणार असून, तिच्यासोबत स्वराज नागरगोजे प्रमुख नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
'तारिणी' ही दुष्टांचा संहार करून सर्वांचं रक्षण करणाऱ्या एका स्पेशल क्राईम युनिट ऑफिसरची गोष्ट आहे. कुटुंबातील सदस्यांकडून नाराजीचा सामना करत असतानाही, तारिणी सकारात्मक राहून सर्वांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करते. शिवानी सोनारचा या मालिकेतील सोज्वळ, मोहक पण तेवढाच रुबाबदार अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.
कोण आहे 'हिरो'?
या मालिकेत मुख्य नायकाची भूमिका अभिनेता स्वराज नागरगोजे साकारणार आहे. त्याने 'केदार' नावाचं पात्र साकारलं आहे. यापूर्वी स्वराजने 'सन मराठी'वरील 'तुझी माझी जमली जोडी' या मालिकेत काम केलं आहे. तसेच, 'लेक असावी तर अशी' आणि 'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ' यांसारख्या चित्रपटांमध्येही त्याने महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.
शिवानी सोनार आणि स्वराज नागरगोजे यांच्यासोबतच या मालिकेत अभिज्ञा भावे, सुवेधा देसाई, आरती वडगबाळकर, नियती राजवाडे, रुपाली मांगले, निकिता झेपाले, अंजली कदम, पंकज चेंबूरकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री रागिणी सामंत यांसारखे अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहेत.
सध्या तरी 'तारिणी' मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख आणि वेळ जाहीर झालेली नाही. लवकरच झी मराठीकडून याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. प्रेक्षकांमध्ये या मालिकेबद्दल उत्सुकता असून, संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या जात आहेत.